सावंतवाडी प्रतिनिधी: आरोग्य सहायिका सौ श्वेता घाडी यांनी आपल्या ३२ वर्षाच्या प्रदीर्घ आरोग्य सेवेत रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वांना सोबत घेत प्रामाणिकपणे काम केले. त्यामुळे त्यांची आरोग्य क्षेत्रातील कामगिरी सर्वांसाठी आदर्शवत आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाळसाहेब पाटील यांनी केले. माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सहायिका श्वेता मधुकर घाडी या आपल्या ३२ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर स्वेच्छा निवृत्त झाल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
माणगाव बाजार येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या स्वेच्छानिवृत्ती कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाळसाहेब पाटील, श्री पिंपरी, माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ शिल्पा पाटील, डॉ विक्रांत सावंत, डॉ हर्षल सागावकर, मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ गोरड व सर्व कर्मचारी, लक्ष्मी भास्कर घाडी, कुडाळ तालुका आरोग्य कार्यालयाचे कनिष्ठ सहाय्यक रामचंद्र पवार, आरोग्य सहायक शंकर परब, माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक श्री आसवले, एन एन अणावकर, सेवानिवृत्त औषध निर्माण अधिकारी श्री नाईक गावकर, सेवानिवृत आरोग्यसेविका श्रीम नाईक गावकर, ग्रामपंचायत सदस्या एल ए गावडे, आजी माजी सर्व समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, सेवक कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी डॉ हर्षल सागावकर यांनी सौ घाडी यांना शासकिय सेवेत काम संधी उपलब्ध झाल्यानंतर आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा मानून त्यांनी या संधीचे चीज करत या सेवेत आपल्या कार्याचा ठसा उमठविल्याचे सांगितले. यावेळी सोनिया कदम यांनी सौ श्वेता घाडी या सर्वांसाठी नेहमीच मार्गदर्शक होत्या. त्यामुळे त्यांचे सहकार्य नियमित सर्वांच्या लक्षात राहणार असल्याचे सांगितले. यावेळी श्वेता घाडी यांनी आपल्या सेवेत सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी इतर अधिकारी व आरोग्य सहाय्यक, सेवक व सेविका यांचे नेहमी सहकार्य लाभल्याचे सांगून या सेवेत कुटुंबीयांनीही मोलाची साथ दिल्यामुळेच आपण या क्षेत्रात चांगले काम केल्याचे सांगितले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सौ श्वेता घाडी यांनी राजापूर तालुक्यातील ओणी, फुपेरे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, मोरगाव, मसुरे, ओरोस, माणगाव या ठिकाणी प्रामाणिकपणे सेवा बजावत प्रशासकीय सेवेत महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ श्वेता घाडी यांचे पती तथा सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी मधुकर घाडी यांनी केले.
फोटो माणगाव – सौ श्वेता घाडी यांचा सत्कार करताना डॉ शिल्पा पाटील सोबत अन्य मान्यवर आणि माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व अधिकारी व कर्मचारी