Home स्टोरी आमदार पात्रतेविषयीचा निर्णय लांबणीवर, कागदपत्रांसाठी १ आठवड्याची मुदत !

आमदार पात्रतेविषयीचा निर्णय लांबणीवर, कागदपत्रांसाठी १ आठवड्याची मुदत !

89

१५ सप्टेंबर वार्ता: शिवसेनेच्‍या १६ आमदारांच्‍या पात्रतेविषयी १४ सप्‍टेंबर या दिवशी विधीमंडळामध्‍ये अध्‍यक्ष राहुल नार्वेकर यांच्‍यापुढे सुनावणी झाली. या वेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्‍ही गटांनी अध्‍यक्षांपुढे भूमिका मांडली. या वेळी एकनाथ शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटाच्‍या आमदारांची कागदपत्रे मिळाली नसल्‍याचे सांगितले. त्‍यामुळे कागदपत्रांची देवाणघेवाण करण्‍यासाठी अध्‍यक्षांनी दोन्‍ही गटांना १ आठवड्याची मुदत दिली आहे.

 

सुनावणीच्‍या वेळी एकनाथ शिंदे गटाचे २१, तर उद्धव ठाकरे गटाचे १४ आमदार उपस्‍थित होते. या वेळी उद्धव ठाकरे गटाने आम्‍ही कागदपत्रे अध्‍यक्षांकडे दिली होती. त्‍यामुळे शिंदे गटाला कागदपत्रे देण्‍याचे दायित्‍व अध्‍यक्षांचे होते, अशी भूमिका मांडली. सुनावणीमध्‍ये शिवसेनेच्‍या ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांच्‍या याचिकेवर सुनावणी झाली. पक्षादेश न पाळल्‍यामुळे शिंदे गटाच्‍या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्‍याची मागणी आमदार प्रभू यांनी याचिकेत केली आहे. एकनाथ शिंदे यांच्‍या गटाने गणेशोत्‍सव असल्‍यामुळे कागदपत्रांच्‍या देवाणघेवाणसाठी २ आठवड्यांची मुदत मागितली होती; मात्र अध्‍यक्षांनी १ आठवड्याची मुदत दिली. प्रसिद्धी माध्‍यमांच्‍या प्रतिनिधींशी बोलतांना ठाकरे गटाचे आमदार भास्‍कर जाधव यांनी निर्णय घेण्‍यास वेळकाढूपणा केला जात असल्‍याचा आरोप केला.