सिंधुदुर्ग: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत सहभागी अधिकारी, कर्मचारी यांना पहील्या टप्प्यातील प्रशिक्षण शनिवारी कुडाळ येथे देण्यात आले. कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात एकूण १ हजार ५५४ कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती.
लोकसभा निवडणूक आता जवळ येत आहे. या अनुषंगाने प्रशासन आता जय्यत तयारीला लागले आहे. या अनुषंगाने निवडणूक प्रशासनाच्या वतीने कुडाळ येथे प्राथमिक टप्प्यातील प्रशिक्षण शनिवारी कुडाळ येथील सिद्धिविनायक सभागृहात देण्यात आले. यामध्ये केंद्राध्यक्ष ४०४, मतदान अधिकारी १ – ३६८ व ईतर मतदार अधिकारी (२ व ३) ७८२ अशा १ हजार ५५४ अधिकारी कर्मचारी यांना हे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांची प्रमुख उपस्थित राहत मार्गदर्शन केले.
तसेच सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे,जिल्हा पुरवठा अधिकारी सिंधुदुर्ग तथा प्रशिक्षण नियोजन नोडल अधिकारी सिंधुदुर्ग डॉ पद्मश्री बैनाडे, विजय वरक नायब तहसीलदार तथा सहाय्यक प्रशिक्षण नोडल अधिकारी प्रशिक्षण सिंधुदुर्ग, कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी देखील प्रशिक्षणास उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी मतदार यंत्रणा हाताळणी बाबत सविस्तर माहिती देण्यात आली.