Home स्टोरी आंगणेवाडीत जत्रोत्सवाची लगबग.

आंगणेवाडीत जत्रोत्सवाची लगबग.

220

सिंधुदुर्ग: दक्षिण कोकणचे प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची जत्रा अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. यावर्षी सदर जत्रोत्सव शनिवार २ मार्च रोजी होत आहे. यादिवशी पहाटे ३ वाजल्या पासून एकूण ९ दर्शन रांगाद्वारे भाविकांना आई भराडी मातेचे दर्शन घेता येणार आहे. मंदिर परिसरात जत्रोत्सवाची तयारी गतिमानरित्या सुरु झाली आहे. आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी विकास मंडळ, शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणांकडून जत्रा सुरळीत पार पडण्यासाठी काम चालू आहे. व्यापारी बांधवांनी दुकाने थाटण्यास प्रारंभ केला असून विविध व्यावसाईकांची आंगणेवाडी मध्ये लगबग वाढल्याचे दिसून येत आहे. बिळवस ग्रामपंचायतच्या वतीने सुद्धा पाणी पुरवठा, स्ट्रीट लाइट आदी कामे प्राधान्याने पूर्ण केली जात आहेत. यावर्षी आंगणेवाडी जत्रोत्सव संपल्यावर काही दिवसात कुणकेश्वर जत्रोत्सव असल्याने लाखो भाविकांची पाउले आंगणेवाडीत वळणार असल्याचे संकेत आताच प्राप्त होत आहेत.

 

भाविक गर्दीचा उच्चांक होणार

 

जसजशी दुकाने सजायला लागली, तसतसा आंगणेवाडी परिसर फुलून जात आहे. जत्रोत्सवापूर्वीच आंगणेवाडीत भक्तिमय वातावरण तयार झाले आहे. सामाजिक संस्था व विविध पक्षांकडूनही विविध सामाजिक उपक्रम, शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर व मंदिर परिसरातील विद्युत रोषणाई व फुलांची आरास लक्षवेधी ठरणार आहे. आंगणेवाडी जत्रोत्सवात लाखोंच्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून भाविकांना देवीचे दर्शन घेण्याबरोबरच अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. सामाजिक संस्था तसेच राजकीय पक्षांकडून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. सरबत वाटपाच्या कार्यक्रमापासून ते आरोग्य तपासणीपर्यंतचे अनेक सेवाभावी उपक्रम यात्रेत राबविले जातात. यावर्षी भाविक गर्दीचा उच्चांक होणार असल्याने भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देताना त्रुटी दूर केल्या जात आहेत. दर्शन रांग लाकडी पूल आणि इतर रांग व्यवस्था काम अंतिम टप्यात आले आहे.

देवालयालगत असलेले दोन ट्रान्सफॉर्मर शाळेच्या मागे एकाच ठिकाणी घेण्याचे काम गतवर्षी पूर्ण झाल्याने सदर परिसर अधिक सुरक्षित झाला आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून पूर्णत्वास गेलेल्या सुलभ स्वच्छता गृहामुळे भाविकांची गैरसोय दूर होणार आहे. जत्रेदिवशी रात्री व्हीआयपी मार्गावरील मसुरे देऊळवाडा दत्त घाटी येथे होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी रात्रीच्या वेळी जादा वाहतूक पोलीस याठिकाणी तैनात करणे आवश्यक आहे.

 

रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल

 

आंगणेवाडी जत्रोत्सवास मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी कोकणात येतात. या चाकरमान्यांना जिल्ह्यात येण्यासाठी रेल्वेचा प्रवास अधिक सोईस्कर आहे. सर्व रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. काही गाड्यांचे वेटिंग तिकीट सुद्धा उपलब्ध नाही आहेत. त्यामुळे रेल्वेने सुद्धा १ मार्च रोजी रात्री कुर्ला टर्मिनस येथून विशेष रेल्वे सोडण्याचे जाहीर केले आहे.

एकूणच जत्रा पूर्व तयारीने बऱ्यापैकी वेग घेतला असून आंगणे ग्रामस्थ लाखो भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज होत असल्याचे चित्र आंगणेवाडीत दिसून येत आहे