सावंतवाडी प्रतिनिधी:
अल्पवयीन मुलांकडे दुचाकी वाहने पालकांनी देऊ नयेत, तसेच लहान मुले कानाला मोबाईल लावून किंवा हातात छत्री घेऊन वाहन चालवताना आढळल्यास कारवाई करण्यात येईल. न्यायालयाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करावे लागेल असा इशारा पोलिस उपविभागीय अधिकारी संध्या गावडे यांनी दिला.
श्री गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी पोलीस ठाण्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी व शांतता समितीच्या बैठकीत पोलिस उपविभागीय अधिकारी संध्या गावडे बोलत होत्या. यावेळी प्रभारी पोलिस निरीक्षक अरूण पवार, सहायक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे उपस्थित होते.
यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, अँड नकुल पार्सेकर, रवींद्र मडगावकर, अभिमन्यू लोंढे, विनोद सावंत, ऑगोस्तीन फर्नांडिस, आनंद नेवगी, विजय कासार, राजेश काणेकर, राजेंद्र भाट, चेतन चिंदरकर आदी उपस्थित होते.
शहरासह आजूबाजूला लावलेल्या बंद अवस्थेत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दुरूस्ती करावी. गणेश चतुर्थी निमित्त शहरात अनेक बंगले, फ्लॅट बंद असल्याने चोऱ्या होतात त्यामुळे सणाच्या काळात पोलिस गस्त वाढवावी. शहरातील नाक्यावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा. शहरात बाहेरच्या विक्रेत्यांना बसण्याची व्यवस्था करताना दक्षता घ्यावी, नगरपरिषद, जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकामने रस्त्यावरील झाडी मारताना खड्डे बुजवून घ्यावे, वीज वितरण कंपनीने विज वितरण खंडीत होणार नाही अशी खबरदारी घ्यावी त्यासाठी लगेच उपाय योजना हाती घ्यावी. बीएसएनएल व अन्य कंपन्यांच्या सेवा सुरळीत चालू राहील याची काळजी घ्यावी, असे उपस्थित सदस्यांनी आवाहन केले.
मुंबई ते गोवा महामार्गावर खाजगी बसेस धावणाऱ्या सावंतवाडी शहरातून याव्यात. आंबोली – इन्सुली – मळगाव घाटातील धोकादायक झाडे दूर करावी, महामार्गावरील मीडलकट बंद करून अपघात टाळावे अशा विविध सुचना या बैठकीत सदस्यांनी केल्या.
पोलिस उपविभागीय अधिकारी संध्या गावडे म्हणाल्या, गणेश चतुर्थी सण आनंदात, शांततेत साजरा करण्यासाठी सर्व जनतेने सहकार्य करावे. वाहतूक नियोजन करताना सीसीटीव्ही कॅमेरे बंद असतील ते दुरुस्त करून घेण्यासाठी पोलिस अधीक्षक खबरदारी घेत आहेत. नागरिकांनी सणाला जाताना मौल्यवान वस्तू सोबत न्यावात. रस्त्यावर दुतर्फा झाडे, वीज वाहिन्यांवरील झाडे छाटावी म्हणून निर्देश दिले जाणार आहेत. हेल्मेट कायद्यान्वये सक्तीचे आहे त्यामुळे हेल्मेट वापरा, अल्पवयीन मुलांना मुलांना वाहन देताना काळजी घ्यावी. कायद्यान्वये अल्पवयीन मुलींना वाहन देऊ नये. दुचाकी वाहने चालवताना कानावर मोबाईल किंवा हातात छत्री घेऊन वाहन चालवताना आढळल्यास कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले.