२५ मे वार्ता: उत्तर प्रदेश राज्या मैनपुरी येथे राहणारा दिव्यांग सूरज तिवारी या तरूणाने युपीएसी (UPSC) परिक्षेत यश मिळविले आहे. सूरज तिवारी या तरुणाला एका रेल्वे अपघातात त्याचे दोन्ही पाय आणि एक हात गमवावा लागला. अकस्मातपणे लादलं गेलेल्या अपंगात्वावर सूरजने मात करत युपीएसी परिक्षेत यश मिळवलं आहे. सूरज तिवारीने यूपीएससी परीक्षेत ९१७ वा क्रमांक मिळवला.
सूरजने मिळवलेल्या यशामुळे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही आनंद व्यक्त केला आहे. अखिलेश यादव यांनी ट्विट केले की, ‘मैनपुरीच्या दिव्यांग सूरज तिवारीने पहिल्याच प्रयत्नात IAS परीक्षा उत्तीर्ण करून संकल्पाची शक्ती इतर सर्व शक्तींपेक्षा मोठी आहे हे सिद्ध केले. सूरजच्या ‘सुर्या’सारख्या चमकदार कामगिरीबद्दल हार्दिक अभिनंदन आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा,” असे यादव म्हणाले.
सुरजने समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे की, परिस्थिती कितीही कठीण असो, पण प्रयत्न करणाऱ्यांचा कधीच पराभव होत नाही. सूरजला दोन्ही पाय नाहीत. एक हात नाही. तर दुसऱ्या हाताला फक्त तीन बोटे आहेत, पण सूरजची मेहनत आणि झोकून देवून केलेल्या परिश्रमामुळे आज सूरजने हे स्थान मिळवले आहे. सूरज मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. त्याचे वडील राजेश तिवारी हे शिंपी असून कुरवली येथे त्यांचे छोटेसे टेलरिंगचे दुकान आहे, त्यातून त्यांच्या कुटुंबाचा खर्च चालतो.