मंदिरातील सुशोभीकरण व प्रसन्न गाभाऱ्यातील वातावरण पाहून गहिवरले….
स्वामी दर्शनानंतर अनुराधा पौडवाल यांचे मनोगत.
मसुरे प्रतिनिधी:
साधारणपणे लॉकडाऊनच्या अगोदर अक्कलकोटला येऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेण्याची संधी लाभली होती, त्यावेळी मंदिर समितीने श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या धर्मसंकिर्तन महोत्सवात आपल्याला गायन सेवेची संधी देऊन गायन सेवेच्या माध्यमातून स्वामी सेवा करण्याची संधी दिली होती. त्या आठवणी आजही आपल्या मनात ताज्या आहेत. त्यामुळे येथे आल्यानंतर स्वामींच्या या वटवृक्षाखाली बसून गायलेले अविस्मरणीय क्षण व प्रसंग माझ्या जीवनातील सगळ्यात अनमोल असे प्रसंग आहेत, कारण गायनाच्या माध्यमातून मला प्रसिद्धीतर मिळालेली आहेच, परंतु त्या कलेतून स्वामी चरित्रावर गायन सेवा सादर करणे व तेही स्वामींच्या दरबारात सादर करणे यापेक्षा मोठे समाधान जीवनात कोणतेही नाही. या वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात आल्यानंतर मंदिरातील बदल पाहून आपल्याला अत्यंत आनंद झालेला आहे. बदल झालेल्या वटवृक्ष मंदिराचे परिसर पाहून आपण गहिवरले आहे. वटवृक्ष मंदिरातील हे बदल महेश इंगळे आपल्यामुळे शक्य झाले आहे या शब्दातून त्यांनी महेश इंगळे यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला. निस्सीम स्वामीभक्त या नात्याने आज खूप दिवसांनी अक्कलकोटला येऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्याने आपल्याला आनंद झाला असल्याचे विशेष मनोगत प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी गायिका अनुराधा पौडवाल यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा, देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी गायिका अनुराधा पौडवाल बोलत होत्या.
पुढे बोलताना अनुराधा पौडवाल यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवातील धर्मसंकिर्तन सोहळ्यात यापुढेही आपल्याला गायन सेवेची संधी मिळावी असेही श्री स्वामी समर्थांच्या चरणी साकडे घातले असल्याचे मनोगतही व्यक्त केले. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, प्रसाद सोनार, संजय पवार, श्रीकांत मलवे, स्वामीनाथ लोणारी, सागर गोंडाळ आदींसह अन्य भाविक भक्त उपस्थित होते.