Home स्टोरी अक्कलकोट येथे नविन वर्षी स्वामी दर्शनासाठी भाविकांची गर्दी…!

अक्कलकोट येथे नविन वर्षी स्वामी दर्शनासाठी भाविकांची गर्दी…!

160

अक्कलकोट येथे नविन वर्षी स्वामी दर्शनासाठी भाविकांची गर्दी.

भाविकांच्या हर्षोल्हासात रंगला धार्मिक कार्यक्रमांचा सोहळा.

मसुरे प्रतिनिधी: अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात कोल्हापूर, मुंबई येथील पारंपारिक भजनी मंडळांच्या भावभक्तीच्या भजन गीतांनी वटवृक्ष मंदिर व परिसरात नुतन वर्षाचे उत्साहाने स्वागत करण्यात आले.

३१ डिसेंबरच्या रात्रीच्या शेजारतीनंतर कोल्हापुरच्या गंगावेश येथील उत्तम निगवेकर यांच्या ओम स्वामी चैतन्य भजनी मंडळ, मगरमठी येथील श्री.स्वामी समर्थ भजनी मंडळ, दादर मुंबई येथील स्वामी ओम भजनी मंडळ यांच्याही भक्ती गीतांच्या कार्यक्रमात उपस्थित हजारो भाविक भक्ती रसात रंगून गेले. रात्री १o ते पहाटे ४ या वेळेत या भजनी मंडळांचा कार्यक्रम पार पडला. ३१ डिसेंबर रोजी रात्री ११:३० ते १२ या वेळेत हजारो उपस्थित स्वामी भक्तांनी एकमुखाने श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करुन रात्री १२ वाजता असंख्य फटाक्यांच्या आतषबाजीने मोठया उत्साहात नुतन वर्षाचे स्वागत केले, व एकमेकांना नुतन वर्षाच्या शुभेच्छा देवून सर्वानी स्वामींचे दर्शन घेतले. या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी सर्व भजनी मंडळाच्या प्रमुखांचे स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद देवून यथोचित सन्मान करुन नुतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या या नंतर पुढील कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आले. रात्री १२ वाजता ओम स्वामी चैतन्य भजनी मंडळाच्या उत्तम निगवेकर व सहकाऱ्यांनी अनेक भावभक्ती गीते व सोंगी भारुड सादर केले. या कार्यक्रमात श्री स्वामी समर्थ, हरी ओम स्वामी समर्थ, साई बाबा बोलो, अवलिया अवलिया, शंकर महाराजा, खंडेरायाच्या लग्नाला, अंजनीच्या सुता, शिर्डीवाले साईबाबा इत्यादी अनेक भावभक्तीगीतांच्या तालावर राज्यातील व अक्कलकोट शहरातील अनेक अबालवृध्दांनी दृढ भक्ती संकल्पाचा आनंद लुटून नुतन वर्षाचा महोत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा केला.

या नुतन वर्षाच्या निमित्ताने पहाटे ५ वाजता श्रींच्या काकड आरतीनंतर व दिवसभर अनेक स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेवून नुतन वर्ष सुख समृध्दीचे, आनंदाचे व भरभराटीचे जावो या करीता स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना केले. सर्व कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता व सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरीता मंदिर विश्वस्त समितीचे चेअरमन महेश इंगळे, धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची मोठी तळमळ असलेले महेश इंगळे यांचे सुपुत्र प्रथमेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे कर्मचारी, सेवेकरी व भजनी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.