कोश्यारी यांची जागा झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली आहे. तेही मनाने आणि रक्ताने स्वंयसेवकच आहेत. यावर नंतर बोलूच. नवे राज्यपाल बैस यांचे स्वागत करताना थोडा कोळसा उगाळावा लागला.
मुंबई: भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून पायउतार होताच दैनिक ‘सामना’तून भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. मै अकेला लढ रहा हूँ और सबको भारी पड रहा हूँ, अशी पंतप्रधान भाषा करत आहेत. ते खरे नाही. त्यांनी विरोधकांच्या अंगावर फेकण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचे साप, विंचू, मगरी वगैरे पाळून ठेवले आहेत, असं सांगतानाच महाराष्ट्रात शिवसेनेशी लढण्यासाठी मोदी एकटे नव्हते. तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्यांच्या गोल्डन गँगचे सदस्य होते, अशी टीका दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या या गोल्डन गँगच्या सदस्यांना लाभाची पदे आणि अमिषे देऊन लढाईत उतरवले. ही काही मर्दुमकी नाही. राज्य घटनेची आणि तिच्या रक्षकांची इतकी मानहानी कधीच झाली नव्हती, अशी टीका दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी छातीवर मूठ आपटून बोलत होते. वेगळ्या भाषेत त्याला छाती पिटणे असं म्हणतात, अशी खोचक टीका करतानाच छाती पिटून बोलणे हे पंतप्रधानपदास शोभत नाही, अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.
तसेच सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यापासून ते माजी न्यायाधीश अब्दुल नजीरपर्यंत कुणाकुणाला कशी लाभाची पदे देण्यात आली याचा पाढाच सामनाच्या अग्रलेखातून वाचण्यात आला आहे. मोदी सरकार येताच न्यायाधीशांना निवृत्तीनंतर लाभाची राजकीय पदे देण्यात आली.खुर्च्यांवर विराजमान असताना अदृश्य पद्धतीने काही तरी हातमिळवणी केल्याशिवाय अशा नेमणुका सहसा होत नाहीत. कारण केंद्रातील भाजपचे सरकार हे काही कर्णाचे किंवा धर्माचे राज्य नाही. सत्यवचनी हरिश्चंद्राचे तर नाहीच नाही, असा टोलाही लगावण्यात आला आहे.