केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीपसिंह पुरी यांची भेट घेऊन रिफायनरीविरोधी संघटनेच्या पदाधिकार्यांची स्पष्टोक्ती
रत्नागिरी: राजापूर तालुक्यातील बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाला होत असलेला विरोध आता कोकणात पसरून तो राज्यव्यापी होत आहे. पंचक्रोशीतील ९५ टक्क्यांहून अधिक ग्रामस्थ आणि कोकणवासी हा प्रकल्प होऊ देणार नाहीत, अशी स्पष्ट माहिती बारसू सोलगाव पंचक्रोशी रिफायनरीविरोधी संघटनेच्या पदाधिकार्यांनी केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीपसिंह पुरी यांना देहलीतील त्यांच्या संसदीय कार्यालयात भेटून दिली. या वेळी ही सर्व सूत्रे आणि ग्रामस्थांचा संघर्ष याची पूर्ण कल्पना असल्याचे मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी शिष्टमंडळाला सांगितले.
या वेळी ठाकरे गटाचे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्यासमवेत संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे, वैभव कोळवणकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. मंत्र्यांच्या या भेटीमध्ये बारसू ते देवाचे गोठणेच्या सड्यावर असलेल्या १० सहस्र वर्षांपूर्वीच्या कातळशिल्पांचे महत्त्व, आंबोळगड-राजवाडी किनार्याची जैवविविधता आणि किनारपट्टी नियमन क्षेत्र (सी.आर्.झेड.) वर्गवारीविषयीची माहिती पेट्रोलियम मंत्र्यांना देण्यात आली.