सावंतवाडी: कोणत्याही वीर पुरुषाचा आत्मा फार महत्त्वाचा असतो, कारण आत्म जिवंत राहिला तरच इतिहास तरतो. भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास जागतिक पातळीवर सर्वोच्च स्थान मिळवणारा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डेगवे या गावाला देखील स्वतःचा इतिहास आहे, हुतात्मा क्रांतिकारक केशव गवस आणि देवू नाईक यांनी स्वातंत्र्य संग्रामात आपले बलिदान दिले. असाच क्रांतिकारी इतिहास सावंतवाडी संस्थानास देखील लाभला आहे. सावंतवाडी संस्थानचे राजे पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांनीही ‘रयतेचे राजे’ म्हणून उपाधी मिळवली. म्हणूनच सावंतवाडी संस्थानचा उल्लेख महात्मा गांधींनी ‘रामराज्य’ असा केलेला आहे, असे प्रतिपादन इतिहास संशोधक प्रा. डॉ. जी. ए. बुवा यांनी पानवळ – बांदा येथे व्यक्त केले.
येथील गोगटे-वाळके कॉलेज बांदाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. जी. ए. बुवा बोलत होते. यावेळी व्यासपीठावर स्वातंत्र्यसैनिक एस. आर. सावंत, शिक्षण प्रसारक मंडळ बांदाचे अध्यक्ष डी. बी. वारंग, कोमसाप सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव राजू तावडे, माजी तालुकाध्यक्ष प्रा. सुभाष गोवेकर, प्रा रुपेश पाटील, रामदास पारकर, प्राचार्य डॉ. एस. पी. वेल्हाळ आदी उपस्थित होते. दरम्यान कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडीच्या वतीने बांदा पानवळ येथील गोगटे वाळके महाविद्यालयात क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक एस. आर. सावंत, शिक्षण प्रसारक मंडळ बांदाचे अध्यक्ष डी. बी. वारंग यांचा डॉ. जी. ए. बुवा, ॲड. संतोष सावंत, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव राजू तावडे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, बुके देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी सहसचिव राजू तावडे म्हणाले, कोकण मराठी साहित्य परिषद सातत्याने इतिहासाचा जागर करीत आहे. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतिहासाला वेगळी परंपरा आहे. मात्र खरा इतिहास अजूनही वाचकांसमोर येत नाही, तो आणण्याचा प्रमाणिक प्रयत्न कोकण मराठी साहित्य परिषद करीत आहे.ॲड. संतोष सावंत म्हणाले, कोमसाप सावंतवाडी शाखेतर्फे सातत्याने नवनवीन उपक्रम हाती घेत विद्यार्थी व युवकांना घडविण्याचे कार्य केले जात आहे. असे सांगत त्यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेची कार्यप्रणाली विशद केली. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळ बांदाचे सचिव एस. आर. सावंत, अध्यक्ष डी. बी. वारंग यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. तसेच यतीन फाटक व सायली कदम या विद्यार्थ्यांनीही क्रांती दिनाचा जागर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आर. एस. गावडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. के. के. म्हेत्री यांनी केले.
