माजी परिवहनमंत्री अनिल परब यांचा साई रिसॉर्ट प्रकरणाशी संबंध नसल्याचा लोकानियुक्तांचा निर्णय !
रत्नागिर: जिल्ह्यातील मुरुड (तालुका दापोली) येथील कथित साई रिसॉर्टच्या संदर्भात आता लोकायुक्तांचा निकाल आला आहे. हा निकाल ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या बाजूने लागला आहे. लोकायुक्तांचा निकाल आल्यानंतर अनिल परब यांनी म्हटले आहे की, भाजपचे खासदार किरीट सोमैय्या यांनी माझ्यावरती राजकीय द्वेषापोटी आरोप केले होते. आता किरीट सोमय्यांना एकतर क्षमा मागावी लागेल किंवा १०० कोटी रुपये मला द्यावे लागतील.
अनिल परब पुढे म्हणाले की, सोमय्यांनी राज्यपालांकडे माझी तक्रार केली होती. राज्यपालांनी लोकायुक्तांना निर्देश दिले होते आणि लोकायुक्तांच्या समोरच सुनावणी झाली. आता लोकायुक्तांनी ही याचिका फेटाळतांना स्पष्ट सांगितले की, ‘अनिल परब यांचे या रिसॉर्टशी काहीही संबंध नाही. हे रिसॉर्ट सदानंद कदम यांचे आहे.’ मीही प्रारंभीपासून हेच सांगत होतो. तत्कालीन सरकारला कलंकित करण्यासाठीच हे सर्व केले गेले. ज्या यंत्रणांनी हे केले, त्याही चुकीच्या मार्गानेच आदेश देत आहेत, हे लोकायुक्तांच्या आदेशाने सिद्ध झाले आहे. त्यामुळेच मी किरीट सोमय्या यांच्यावरती शंभर कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा केला होता.हे प्रकरण फक्त आता उच्च न्यायालयात बाकी आहे. त्यातही मला अंतरिम स्थगिती (इंटरियम स्टे) मिळालेली आहे. त्यामुळे किरीट सोमैय्या यांच्यावरचा दावा बळकट होतोय. याविषयी पुन्हा एकदा मी न्यायालयाकडे जाईन आणि न्यायालयाला ‘या सगळ्या गोष्टींचा विचार करून किरीट सोमैय्या यांना योग्य ती शिक्षा द्यावी.’, असे सांगीन.