मसुरे प्रतिनिधी: केंद्रशाळा मसुरे नं.१ च्या विद्यार्थी, शिक्षक, पालक व मसुरे ग्रामस्थांच्या वतीने ऐतिहासिक भरतगड किल्ल्यावर मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या गजरात ऐतिहासिक पारंपारिक वेशभूषा सादर करून छत्रपतींच्या आठवणींना उजाळा देऊन मसुरे येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवजयंती निमित्त विद्यार्थ्यांनी शिवकालीन वेशभूषा सादर करून मसुरे बाजारपेठ परिसरात प्रभात फेरी काढली आणि वातावरण शिवमय करून टाकले होते. जय भवानी जय शिवाजी हा नारा मसुरे बाजारपेठे भरतगडाच्या पायथ्याशी दुमदुमून गेला होता. यावेळी मसुरे येथील ग्रामस्थ रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहून छत्रपतींना मानवंदना देत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून ऐतिहासिक भरतगड किल्ल्यावर मसुरे केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने साफसफाई करण्यात आली. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भरतगड किल्ल्यावरील श्री सिद्ध महापुरुष मंदिर परिसरात शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याची महती सांगणारी विविध भाषणे सादर केली. मसुरे येथील ऐतिहासिक भरतगड किल्ल्याचे महत्त्व आणि इतिहास मान्यवरांनी येथील सर्व विद्यार्थ्यांना कथन केला. इयत्ता आठवीतील विद्यार्थी कु. आदित्य अनिल मेस्त्री याने शिवाजी महाराजांवरील पोवाडा सादर करून उपस्थित पालक व ग्रामस्थांची मने जिंकली. त्याला पाचवी ते आठवी मधील विद्यार्थ्यांनी कोरस साथ दिली. पोवाडा सादर करण्यासाठी कलाशिक्षक श्री. विनोद सातार्डेकर व श्री. गोपाळ गावडे यांनी मार्गदर्शन करून उत्तम संगीत साथ दिली. यावेळी मसुरे केंद्रप्रमुख नारायण देशमुख म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशासाठी आदर्श असे होते.
असे राजे पुन्हा होणे नाही. आपण सर्वांनी त्यांचा आदर्श घेऊन वाटचाल केल्यास आपले जीवन आनंदी मय होऊन जाईल. मसुरे केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शर्वरी सावंत यांनी यावेळी बोलताना सांगितले मसुरे या ऐतिहासिक गावामध्ये असलेला भरतगड किल्ला या गावाचे भूषण असून आज छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गडावरती हा ऐतिहासिक सोहळा केंद्र शाळेच्या वतीने संपन्न करताना आमचे मन भरून आले आहे. आज छत्रपतींची कीर्ती जगभर प्रसिद्ध असून या कीर्ती मध्ये मसुरे गावाचा सुद्धा एक भाग आहे हे आम्हा सर्वांना अभिमानाचे आहे.
शिवजयंती पासून “जय जय महाराष्ट्र माझा” या गीताचे महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून निवड झाल्यामुळे सर्व विद्यार्थी पालक व ग्रामस्थ यानी एकसुरात हे गीत भरतगड किल्ल्यावर सादर केले. विविध प्रकारच्या वेशभूषा मुलांनी सादर केलेल्या असल्यामुळे भरतगड किल्ल्यावरती ऐतिहासिक शिवजयंती उत्सव साजरा होत असल्याचा भास आज मसुरे ग्रामस्थांनी अनुभवला. या कार्यक्रमास मसुरे केंद्रप्रमुख श्री. नारायण देशमुख, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. सन्मेश मसुरेकर, उपाध्यक्ष सौ. शीतल मसुरकर, माजी सरपंच सौ. लक्ष्मी पेडणेकर, मुख्याध्यापिका सौ. शर्वरी सावंत, गुरुनाथ ताम्हणकर, गोपाळ गावडे, विनोद सातार्डेकर, रामेश्वरी मगर, उमेश खराबीदीप्ती पेडणेकर, संजना मसुरकर, शिरीष प्रभुगावकर, श्रेया मोरे, शैलेश मसुरकर, समिहा गोलतकर, अनुष्का मोंडकर, मयुरी शिंगरे, हेमलता, दुखंडे, संतोष दुखंडे, शरद मोरे, दीपक पेडणेकरशिक्षक वर्ग, सदस्य, पालक व मसुरे ग्रामस्थ उपस्थित होते.शिवाजी वेषभुषा- असद पटवेकर या मुलाने सादर केली होती. यावेळी अंगणवाडी ची बाल विद्यार्थिनी निधी दीपक पेडणेकर हिने पारंपारिक वेशभूषा सादर करून शिवाजी महाराजांवरती सादर केलेले भाषण या कार्यक्रमात सर्वांसाठी कुतूहालाचे ठरले.सूत्रसंचलन संस्कृती मसुरेकर, आभार यश बागवे यांनी मानले.कॅप्शन.. मसुरे केंद्रशाळा, शिक्षक, पालक, ग्रामस्थ यांच्यावतीने मसुरे येथील ऐतिहासिक भरतगड किल्ल्यावरती शिवजयंती उत्सव साजरा करताना शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थ शिक्षक वर्ग..