Home स्टोरी आध्यात्मात काळानुरुप बदल आवश्यक! नितीनभाऊ मोरे….

आध्यात्मात काळानुरुप बदल आवश्यक! नितीनभाऊ मोरे….

106

नाशिक प्रतिनिधी: भगवान विष्णुंनी दशावतार घेतले. या सर्व अविष्कारांनी विभिन्न कार्य केले. त्या त्या परिस्थितीत जे आवश्यक आहे असेच दैवी कार्य या अवतारांनी केले. त्यामुळे अध्यात्मात काळानुरुप बदल आवश्यक असून हे बदल सर्वांनी स्वीकारले पाहिजेत, असे स्पष्ट मत अखिल भारतीय श्री स्वामी स्वामी समर्थ सेवामार्गाच्या देश-विदेश अभियानाचे प्रमुख श्री. नितीनभाऊ मोरे यांनी व्यक्त केले तसेच कोणत्याही पद्धतीची अंधश्रद्धा पसरणार नाही असे सेवाकार्य करा, असे आवाहनही त्यांनी केले.सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने सेवामार्गाच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठात सात दिवसीय निवासी याज्ञिकी प्रशिक्षण सुरु आहे. संपूर्ण राज्यभरातून २६० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत. या प्रशिक्षणामध्ये नाम जप यज्ञ सप्ताह, विशेष स्तोत्र, मंत्र, पूजा पद्धती, संध्या, होम हवन, संस्कृत संवाद, या सेवांविषयी प्रशिक्षण देऊन नवीन याज्ञिकी घडविले जात आहेत.

सहभागी प्रशिक्षणार्थी

गुरुवार दि. २७ जुलै रोजी श्री. नितीनभाऊ मोरे यांनी याज्ञिकी प्रशिक्षणात अत्यंत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.श्री. मोरे म्हणाले की, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग नेहमी जनहित आणि राष्ट्र विकासाला प्राधान्य देतो. काही दशकांपूर्वी आध्यात्मिक सेवा महिला-भगिनींना करण्याचा अधिकार नव्हता. मात्र सद्गुरु परमपूज्य मोरेदादांनी माता-भगिनींना श्रीगुरुचरित्र तसेच श्री दुर्गा सप्तशती वाचण्याचा अधिकार मिळवून दिला आणि अध्यात्मात जणू क्रांती केली. त्यामुळे आज प्रत्येक महिला सेवेकरी श्रीगुरुचरित्र पारायणाची सेवा आनंदाने करु शकते. त्याच पद्धतीने परमपूज्य गुरुमाऊलींनीही श्रीगुरुचरित्राचे शुद्धीकृत रुप प्रकाशित करुन अध्यात्मात महत्त्वपूर्ण कार्य केले. गुरुमाऊलींनी काळानुरुप योग्य ते बदल करुन सर्वसामान्यांना अध्यात्म अतिशय सोपे करुन सांगितले.

संक्षिप्त भागवत, ९०० श्लोकी नवनाथ, श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाप्रमाणेच जुन्या व नवीन घराची वास्तूशांती करण्यासाठी वास्तूशांती भाग-१ व वास्तूशांती भाग -२ हे महत्त्वपूर्ण ग्रंथ गुरुमाऊलींनी प्रकाशित करुन सेवेकर्‍यांना वास्तूशांतीसाठी सोसावा लागणारा खर्च कमी केला आहे अशी सविस्तर माहिती श्री. मोरे यांनी दिली. आगामी काळात गाणगापूरला बालसंस्कार आणि पिठापूरला देश-विदेश अभियानचे प्रशिक्षण होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.