Home राजकारण विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसमध्ये चुरस!

विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसमध्ये चुरस!

124

२२ जुलै वार्ता: एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बंडानंतर राजकीय घडामोडी वाढले आहेत. दरम्यान विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसमध्ये चुरस निर्माण झाली आहे. अनेक मातब्बर नेत्यांनी या पदासाठी फिल्डिंग लावली आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर विधानसभेत काँग्रेसचे संख्याबळ जास्त असून त्यांच्याकडे ४४ आमदार आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला मिळणार, हे निश्चित आहे. परंतु, काँग्रेस पक्षातच विरोधी पक्षनेते पदावरून रस्सीखेच सुरू आहे. आता त्यात काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांनी थेट हायकमांडला पत्र पाठवले आहे. या पत्रात ३० आमदारांचा मला पाठिंबा असल्याचा दावा थोपटे यांनी केला आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी सुरुवातीला काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेत्यांची नावे आघाडीवर होती. त्यानंतर गेल्या २ दिवसांपासून काँग्रेस दुसऱ्या फळीतील नेतृत्व पुढे आणण्याची शक्यता आहे. त्यात अनेक नावे चर्चेत आहेत.

३० आमदारांचा पाठिंबा असून मी विरोधी पक्षनेतेपदासाठी इच्छुक असल्याचे थोपटे यांनी हायकमांडला सांगितले आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसमध्ये नेहमीप्रमाणे चुरस पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी या पदासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची नावे चर्चेत होती. त्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांचा समावेश होता. मात्र, ही नावे आता मागे पडली आहेत. आता दुसऱ्या फळीतील नेत्यांची नावे चर्चेत आली आहेत. त्यात विजय वड्डेटीवार, यशोमती ठाकूर आणि सुनील केदार यांची नावे पुढे आली आहेत. पण, हायकमांडने अजून कुठल्याही नावावर शिक्कामोर्तब केले नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेते कोण होणार, याकडे लक्ष लागले आहे.