Home स्टोरी कुडाळ तालुक्यात धो धो, शहरात रस्त्यांवर पाण्याने वाहतुक ठप्प!

कुडाळ तालुक्यात धो धो, शहरात रस्त्यांवर पाण्याने वाहतुक ठप्प!

176

सर्वत्र पुरस्थिती: जनजीवन विस्कळीत!

कुडाळ: कुडाळ तालुक्यात गुरूवारी सर्वत्र ढगफुटी सदृश्य जोरदार पाऊस कोसळल्याने नद्यांना पूर आला. परिणामी तालुक्यातील ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले. कुडाळ शहरात येणा-या हाॅटेल गुलमोहर नजिक मुख्य रस्त्यावर तसेच रेल्वे स्टेशन रस्त्यावर येथील भंगसाळ नदीच्या पुराचे पाणी आल्याने शहरातील या दोन्ही मार्गावरील वाहतुक सायंकाळपासून ठप्प झाली आहे. शहरातील अन्य रस्तेही जलमय झाले. माणगांव खोर्‍यातील दुकानवाड पंचक्रोशीतील काॅजवे पाण्याखाली गेल्याने या भागातील वाहतूक ठप्प झाली. नदीकाठच्या परिसरात पुराचे पाणी पसरल्याने शेकडो हेक्टर शेतजमिन पाण्याखाली गेली. तालुक्यात गेले तीन दिवस मुसळधार पाऊस सुरू असुन गुरूवारी दुपार पासुन पावसाचा जोर अधिक वाढला. शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस कोसळल्याने सर्वच नद्यांना पुर आला. या पुराचे पाणी नदि काठच्या परिसरात शिरल्याने तालुक्यात पुरस्थिती  निर्माण झाली. येथील भंगसाळ नदिच्या पुराचे पाणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील घरांपर्यंत दाखल झाले होते. या ठिकाणच्या  नागरीकांनी सुरक्षेच्या दृष्टिने आवश्यकती खबरदारी घेत साहित्यासह सुरक्षित स्थळी स्थलांतर केले. हॉटेल गुलमोहर नजिक शहरात येणार्‍या मुख्य मार्गावर सायंकाळी साडेपाच वाजल्यापासुन पुराचे पाणी आले. तसेच रेल्वे स्टेशन रस्त्यावर सिध्दीविनायक हॉल नजिक रस्त्यावर पुराचे पाणी आले. त्यामुळे या दोन्ही मार्गावरील वाहतुक सायंकाळ पासुन ठप्प झाली होती.

न.पं. व पोलिस प्रशासनाने याठिकाणी रस्त्यावर बॅरिगेट लावुन वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. मच्छिमार्केटकडे जाणार्‍या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने हा रस्ता जलमय झाला. कॉलेज चौक येथे गटारातील पाणी वाहण्याचा मार्ग बंद झाल्याने तेथे तिन्ही बाजुच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले तसेच नजिकची घर व दुकानात पाणी घुसून साहित्याचे नुकसान झाले. तेथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या पाण्यातुनच वाहनधारक व पादचार्‍यांची ये-जा सुरू होती. त्यांना या पाण्याचा नाहक त्रास सहन करावा लागला. कुडाळ – मालवण मार्गावर नाबरवाडी रेल्वे ब्रिज नजिक ओढ्याचे पाणी मुख्य रस्त्यावर आल्याने तेथील रस्ता पाण्याखाली गेला. माणगांव खोर्‍यात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळल्याने दुकानवाड पंचक्रोशीतील कॉजवे पाण्याखाली गेल्याने या परिसरातील वाहतुक विस्कळीत झाली. आंबेरी येथील जुन्या पुलावर पुराचे पाणी आले. परंतु तेथे नव्याने बांधण्यात आलेल्या पुलावरून वाहतुक वळविण्यात आल्याने वाहनधारकांची गैरसोय टळली. परंतू अधिकृत हे पूल वाहतुकीस सुरू न केल्याने या पुलावरून एसटी वाहतूक सेवा बंद होती.