१७ जुलै, सिंधुदुर्ग, वार्ता: भटवाडी सावंतवाडी येथील सिनेमा टॉकीज ते दत्त-विठ्ठल मंदिर भटवाडी येथील रस्त्यांची खड्डेमय चाळण झालेली आहे. नगरपरिषदेला कित्येक वेळा निवेदन देऊनही याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. विचारणा केली असता रस्ता मंजूर झालेला आहे; परंतु नगरपरिषेकडे फंड नसल्याकारणाने काम थांबले आहे, असं नगरपरिषद प्रशासनाकडून उत्तर मिळत आहे. परंतु आता आम्ही शांत बसणार नाही अशी भूमिका भटवाडी येथील ग्रामस्थांनी घेतली आहे. कारण रस्त्यामध्ये पडलेल्या खड्ड्यांमुळे एक दोन वेळा अपघातही घडला होता. अशा अपघातग्रस्त रस्त्यावरून शाळकरी मुलं जा-ये करत असतात. प्रशासनाच्या एका चुकीमुळे विनाकारण शाळकरी मुलं व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे; म्हणून या सर्व परिस्थितीला कंटाळून शेखर सुभेदार यांच्या पुढाकाराने दिनांक 15 जुलै रोजी ग्रामस्थांसमवेत रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्ड्यामध्ये झाडे लावून नगरपरिषद प्रशासनाचा निषेध करण्यात आला. आठ दिवसात रस्त्यावरील खड्डे न बुजवल्यास खड्ड्यामध्ये बसून रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल, असा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आलेला आहे. यावेळी शेखर सुभेदार, संजय पेडणेकर, उदय अळवणी,अशोक पेडणेकर, प्रवीण ठाकूर, गुरु कोरगावकर, साई सुभेदार, शानू सुभेदार, विकास सावंत, बाळा गावडे, विनायक कांडरकर, नितीन सामंत, अभिषेक चव्हाण, माधव कशाळीकर, निकेश पेडणेकर, गौतम साटेलकर आदी उपस्थित होते.
Home स्टोरी भटवाडी- सावंतवाडी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे स्थानिकांमध्ये संताप; नगरपरिषदेचे अक्षम्य दुर्लक्ष