२ जुलै वार्ता: शनिवारी काढलेल्या ठाकरे गटाच्या मोर्चाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खिल्ली उडवली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
कोरोना काळातील गैरव्यवहारांची ईडीकडून चौकशी सुरू झाल्याने धाबे दणाणलेल्या आदित्य सेनेने मुंबई महापालिकेवर मोर्चा नेण्याऐवजी मातोश्री १ ते मातोश्री २ मोर्चा काढायला पाहिजे होता. ठाकरे गटाने शनिवारी काढलेल्या मोर्चाचे ठिकाण चुकले आहे. जो काही गैरव्यवहार झाला आहे ‘मातोश्री’मध्ये झाला आहे. बुलडाणा येथील अपघातात २५ जणांचा मृत्यू झाल्याने संवेदनशील असल्याने भाजपने मोर्चा रद्द केला. मात्र, कोणतीही संवेदना न उरलेल्या व केवळ राजकारण करणार्यांनी मोर्चा काढला.
हा मोर्चा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. कोव्हिड सेंटर लोकांना जगवण्यासाठी बनवली होती की, मारण्यासाठी हा प्रश्न निर्माण झाला आहे. बोगस कोव्हिड सेंटर, बोगस डॉक्टर, बोगस ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले, सदोष ऑक्सिजन प्रकल्पांमुळे रुग्णांना ब्लॅक फंगस आजार झाला. एवढेच नव्हे, मृतांच्या टाळूवरील लोणी खाणार्यांनी कोरोना काळातील मृत व्यक्तींंचे मृतदेह नेण्यासाठी वापरण्यात येणार्या बॉडीबॅगसाठी सहाशे रुपयांऐवजी तब्बल साडेसहा हजार रुपये खर्च केले. आम्ही ठाण्यात तीच बॅग अवघ्या 325 ला घेतली. काही जण ठाण्यातील व्यवहारांची चौकशी लावण्याची चर्चा करत आहेत. मात्र, कोणताही गैरव्यवहार झालेला नसल्याने बिनधास्त चौकशी लावा, असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिले.