२९ जून वार्ता: पंढरीची वारी व पालखी सोहळ्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा मूलमंत्र राज्यातील घराघरांत पोहचवणाऱ्या स्वच्छता दिंडीचा समारोप मोठ्या उत्साहात करण्यात आला. गेल्या १७ वर्षांपासून स्वच्छता दिंडी काढण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केल्यामुळं नागरिक स्वच्छतेबाबत जागरुक झाले आहेत. स्वच्छतेची लोकचळवळ होणं ही समाधानकारक बाब आहे, असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं.
पंढरपूरात सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिक बंदी, कचरा व्यवस्थापन चांगल्या रितीनं झालं आहे. पंढरपूरच्या वारीला शतकानुशतकांची परंपरा आहे. यात मोठ्या प्रमाणात वारकरी सहभागी होतात. त्यामुळे शासन-प्रशासनाची जबाबदारी वाढते आहे. अशावेळी स्वच्छतेचे नियोजन आणि इतर सुविधा चांगल्याप्रकारे देण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे.
पंढरपूर येथे विशेषत: स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. शासन वारकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगून शिंदेंनी स्वच्छता दिंडीत सहभागी वारकरी बंधु-भगिनींचे अभिनंदन केले. यावेळी महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, आमदार भरत गोगावले, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी उपस्थित होते.