७ जून वार्ता: ऊस तोडणी मुकादम आणि वाहतूकदार यांच्याकडून साखर कारखानदारांची २०० कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. ही फसवणूक ऊसतोडणीसाठी कारखान्यांकडून वाहतूकदार आणि मुकादम यांच्याशी केलेल्या कराराच्या माध्यमातून करण्यात आली असल्याची माहिती, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली.सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांची सर्वाधिक ३२ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. गेल्या १५ वर्षांमध्ये अंदाजित २ सहस्र कोटी रुपयांची या माध्यमातून फसवणूक झाली आहे. कारखाने ऊसतोडणीसाठी ऊसतोडणी कामगारांशी करार करत नाहीत. मुकादम आणि वाहतूकदार यांच्याशी करार करतात. वर्षांनुवर्षे असेच चालत आहे; परंतु सध्या बोगस मुकादम आणि वाहतूकदार यांचे पेव फुटले असल्याने यंदा अधिक प्रमाणामध्ये फसवणूक झाली आहे.असे असले, तरी सामान्य ऊसतोडणी कामगारांना वेठीस धरले जाते. फसवणूक मुकादम आणि वाहतूकदार करतात; मात्र कामगार कायद्यात अडकतात आणि त्यांच्यावर गुन्हे नोंद केले जातात. धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांवर कोल्हापूर, सोलापूर आणि कर्नाटक येथे गुन्हे नोंद झाले आहेत, तसेच त्यांची वाहने कारखान्यांकडून अनधिकृतपणे अडवून धरली जातात.
Home क्राईम मुकादम आणि वाहतूकदार यांच्याकडून राज्यातील साखर कारखान्यांची २०० कोटी रुपयांची फसवणूक!