Home स्टोरी शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान झालेल्या मृत्यूंच्या घटनांची उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या एकसदस्यीय समितीमार्फत होणार सखोल चौकशी...

शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान झालेल्या मृत्यूंच्या घटनांची उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या एकसदस्यीय समितीमार्फत होणार सखोल चौकशी जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांचे निर्देश!

212

म्हसळा प्रतिनिधी: तिथीनुसार दि. २ जून  व तारखेनुसार दि. ६ जून २०२३ रोजी किल्ले रायगडावर आयोजित करण्यात आलेल्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान दि.२ जून २०२३ रोजी ओमकार दिपक भिसे, वय १९ वर्षे रा. संकेश्वर ता. हुकेरी जि. बेळगाव यांचा व दि. ४ जून, २०२३ रोजी प्रशांत गुंड, वय २८ वर्षे रा. पुणे यांचा मृत्यू झाला.        या मृत्यूंच्या घटनांची तीव्रता पाहता या घटनांची समितीमार्फत सखोल चौकशी होणे आवश्यक आहे, यानुषंगाने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,रायगड डॉ.योगेश म्हसे  यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा – २००५ अन्वये त्यांना प्राप्त अधिकारानुसार या घटनांची चौकशी करण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी, महाड यांची एकसदस्यीय समिती गठीत केली आहे.    

उपविभागीय दंडाधिकारी यांनी नमूद दोन्ही घटनांची सखोल चौकशी करुन अहवाल त्यांच्या अभिप्रायासह तातडीने पंधरा दिवसांत  सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. महाड प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड यांना

१) घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने सर्व स्तरावर सखोल चौकशी करणे.

२) शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने घेतलेल्या महाड बैठकांमध्ये दिलेल्या सूचनांची सर्व संबंधित विभागांनी अंमलबजावणी केली अगर कसे? याबाबत चौकशी करणे.

३) सर्व संबंधितांचे म्हणणे दाखल करुन घेणे.

४) सदर घटना या कोणत्याही व्यक्ती अथवा यंत्रणांच्या चुकी अथवा हलगर्जीपणामुळे घडल्या की हा अपघात होता, याबाबत निरीक्षण नोंदविणे

५) सदर घडलेल्या घटनेचा चौकशी अहवाल आपल्या स्पष्ट अभिप्रायासह सादर करणे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.     

तसेच या सोहळयाच्या नियोजनामध्ये सहभागी असलेल्या कोणत्याही शासकीय विभागाच्या विभाग प्रमुखास चौकशी अधिकाऱ्यांनी साक्ष देण्यासाठी अथवा अहवाल सादर करण्यास बोलाविल्यास त्यांनी तात्काळ हजर राहणे अथवा अहवाल सादर करणे अनिवार्य असेल. असे करण्यास कुचराई केल्यास संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा – २००५ मधील कलम ५१, ५५ व ५६ अन्वये कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकारी डॉ.म्हसे यांनी सूचित केले आहे.