Home स्टोरी ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये कोणत्याही ओळखपत्राविना पालटू शकता २ सहस्र रुपयांच्या नोटा!

‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये कोणत्याही ओळखपत्राविना पालटू शकता २ सहस्र रुपयांच्या नोटा!

67

२२ मे वार्ता: १९ मे या दिवशी रिझर्व्ह बँकेने २ सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून बाद होणार असल्याची घोषणा केल्यावर सामाजिक माध्यमांतून त्या जमा करण्यासंदर्भात अनेक उलट-सुलट गोष्टी पसरवल्या जात आहेत. अशातच भारताची सर्वांत मोठी बँक असलेल्या ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ने त्याच्या भारतभरातील शाखांसाठी एक परिपत्रक जारी केले आहे. त्यांतर्गत कुणालाही स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत कोणत्याही ओळखपत्राविना, तसेच कोणतीही ‘स्लिप’ अथवा ‘फॉर्म’ न भरता २ सहस्र रुपयांच्या नोटा जमा करता येणार आहेत. एका वेळी केवळ २० सहस्र रुपयांपर्यंत म्हणजे २ सहस्र रुपयांच्या १० नोटा स्टेट बँकेत जमा करता येतील.२३ मेपासून नोटा पालटण्याचे काम चालू होईल. ३० सप्टेंबर २०२३ म्हणजे साधारणपणे पुढील ४ मासांमध्ये या नोटा पालटून घेता येणार आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार ३१ मार्च २०२३ पर्यंत २००० रुपयांच्या १८१ कोटी नोटा चलनात होत्या.

जाणून घ्या अन्य महत्त्वपूर्ण सूत्रे!

१. कोणत्याही बँकेत जाऊन नोटा पालटता येऊ शकतात. एका विशिष्ट बँकेची यासाठी निवड करण्यात आलेली नाही !

२. तुमचे एखाद्या बँकेत खाते नसले, तरी तेथे जाऊन तुम्ही नोटा पालटू शकता.

३. जर तुमचे खाते असेल, तर त्या बँकेतून तुम्ही अल्प रकमेच्या नोटा पालटून घ्यायला हवे, असेही नाही. तुम्ही खात्यात पैसे भरूही शकता.

४. नोटा पालटून घेण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे. यासाठी तुम्हाला संबंधित बँकेमध्ये अतिरिक्त रक्कम देण्याची आवश्यकता नाही. जर कोणत्याही कर्मचार्‍याने तुमच्याकडे यासाठी पैसे मागितले, तर तुम्ही बँक अधिकारी किंवा ‘बँकिंग लोकपाल’ यांच्याकडे तक्रार करू शकता.

५. २ सहस्र रुपयांच्या नोटा व्यवहारासाठी वापरल्या जाऊ शकतात आणि ‘पेमेंट’ म्हणूनही प्राप्त केल्या जाऊ शकतात. रिझर्व्ह बँकेने ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत किंवा त्यापूर्वी या नोटा बँकेत जमा करण्याचा किंवा पालटून घेण्याचा सल्ला दिला आहे.