Home स्टोरी वर्ल्ड मराठा ऑरगनायजेशनचे संस्थापक अध्यक्ष ‘प्रवीण पिसाळ’ यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन…..

वर्ल्ड मराठा ऑरगनायजेशनचे संस्थापक अध्यक्ष ‘प्रवीण पिसाळ’ यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन…..

113

२० मे वार्ता: मुंबई: world Maratha Organization ची स्थापना करणारे प्रवीण पोपटराव पिसाळ यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. प्रवीण पिसाळ यांनी अतिशय तरुण वयात २०१३ साली आपली ही चळवळ सुरु केली होती. मराठा आरक्षण आंदोलन तीव्र होत होते, या काळात त्यांनी world Maratha Organization ची स्थापना केली होती, या माध्यमातून त्यांनी अनेक तरुणांना रोजगारासाठी मार्गदर्शन आणि मदत देखील केली होती. तरुणांना रोजगार मिळवून देण्यात, व्यवसायाला बळ देण्यास प्रवीण पिसाळ आघाडीवर होते. WMO सोबत ऑनलाईन खास करुन फेसबूकवर एक कोटी मराठा जोडले गेले होते. त्यातून त्यांनी समाजाच्या प्रत्येक घटकासाठी काम सुरु केलं होतं. महत्त्वाचं म्हणजे, कोरोना काळात सर्वाधिक कार्यशील आणि हजारो लोकांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यात, वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन आघाडीवर होते. यामागे संस्थापक प्रवीण पिसाळ यांचं महत्त्वाचं योगदान होतं. २००८ पासून मराठा समाजास सोशल मीडिया प्लॅटफॉर्म त्यांनी तयार केला होता, पुढे WMO हा फेसबूकवर १ कोटीच्याही पुढे गेला. मराठा हॉस्टेल ही प्रवीण पिसाळ यांची कल्पना मात्र अजून तरी पूर्णत्वास आली नाही. जो ग्रुप १ कोटीवर गेला होता, तो नंतर आतील विरोधकांनीच बंद केला. तरी देखील प्रवीण पिसाळ यांचे कार्य़ सुरुच होते.

प्रवीण पिसाळ यांचं अतिशय तरुण वयातलं हे काम सर्व समाजासाठी, तळागाळातील लोकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे, मात्र काही तरी अपूर्ण राहून गेल्याची खंत प्रवीण यांच्यासोबत काम करणाऱ्या साथीदारांना कायम सलणारी बाब राहणार आहे.आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्याने एक मराठा लाख मराठा नाही तर करोडो मराठ्यांना जोडलं. प्रवीण पिसाळ यांच्या जाण्याने त्यांचे अनेक तरुण सहकारी धक्क्यातून सावरायला अजूनही तयार नाहीत. प्रवीण पिसाळ यांची जाण्याची ही वेळ नक्कीच नव्हती.

अनेकांनी त्यांच्याशी तात्विक वाद घातले, त्यांनी वादालाही उत्तरं दिली, पण अखेर लाखोंना जोडणारा व्यक्ती जेव्हा लाखोंना सोडून जात आहे, तेव्हा प्रत्येक जण हळवा होतोय, प्रत्येक जण आपल्या आठवणी सांगतोय.प्रवीण पिसाळ यांनी नावापुढे मराठा लावून कट्टरता दाखवली असली, तरी दुसऱ्या कोणत्याही समाजाकडे, समुहाकडे नकारात्नक दृष्टीकोनाने पाहिलं, नाही. आपण सर्वांना मदत करु ही भूमिका कायम होती.कोरोना काळात महाराष्ट्रात, भारतात जेथे जेथे शक्य असेल ग्रुपवर ज्यांनी मेसेज टाकले त्या प्रत्येक माणसाला मदत पोहोचवण्याचं काम प्रवीण पिसाळ यांनी केलं. प्रवीण पिसाळ यांनी स्थापन केलेल्या ग्रुपला, राज्यातून देशातून आणि परदेशातून काम पाहून भरीव मदत देखील झाली. पण थोडे थोडके चांगले सहकारी सोडले, तर व्यवस्थापनात नंतर अनेक अडचणी आल्या, तेथे प्रवीण यांचा झंझावत थोडा कमी पडला. पण आता प्रत्येकाला वाटतंय, आपण आणखी प्रवीण यांच्यासोबत उभं राहायला हवं होतं. समाजातील प्रत्येक स्तरातून प्रवीण पिसाळ यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.