दोडामार्ग: हत्तींमुळे शेती आणि बागायती यांची हानी होत आहे. ही समस्या अनेक वर्षांची असून ती सोडवण्यात वनविभाग अपयशी ठरला आहे. सातत्याने होणार्या हानीमुळे ग्रामस्थ आणि शेतकरी यांचे मनोबलही खचले आहे. या समस्येविषयी वनविभागाला जाग आणण्यासाठी २५ मे या दिवशी गावातच ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन करतील, अशी चेतावणी मोर्लेचे माजी सरपंच गोपाळ गवस आणि केर गावचे उपसरपंच तेजस देसाई यांनी दोडामार्ग वनविभाग कार्यालयात निवेदनाद्वारे दिली आहे.
गावात हत्तींच्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वेळोवेळी सांगूनही शासन आणि प्रशासन यांच्याकडून या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे. हत्तींमुळे काजू बागायतीमध्ये शेतकरी जात नाही. हानीभरपाईसाठी अर्ज देण्यासाठी दोडामार्ग येथे तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. ही ग्रामस्थांसाठी खर्चिक गोष्ट आहे. वनविभाग पंचनामे करत नाही आणि केले तर त्यामध्ये त्रुटी काढून वेळकाढूपणा केला जातो. याविषयी ग्रामस्थांच्या मागण्यांचा विचार करून ग्रामस्थांसमवेत बैठक घेण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.