Home स्टोरी बाणेर-बालेवाडी 24×7 पाणी पुरवठा योजनेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

बाणेर-बालेवाडी 24×7 पाणी पुरवठा योजनेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

92

१६ मे वार्ता: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेतर्फे शहरासाठी करण्यात आलेल्या सुस-म्हाळुंगे पाणी पुरवठा योजनेचेभूमिपूजन आणि २४x७ समान पाणीपुरवठा प्रकल्पाअंतर्गत वारजे जलशुद्धीकरण केंद्र ते बाणेर-बालेवाडीयेथील मुख्य दाब नलिकांचे व पाण्याच्या टाक्यांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुणे केवळ ऐतिहासिक शहर नसून भविष्यातील शहर आहे. जगाच्या पाठीवर २१ व्या शतकातील ‘नॉलेज सिटी’ म्हणून नोंद असलेले पुणे शहर आहे, ही ज्ञाननगरी आहे. पुणे शहर विज्ञान आणि नाविन्यतेची राजधानी आहे. पुणे जिल्हा महाराष्ट्राचा ‘मॅन्युफॅक्चरिंग हब देखील आहे. देशातील २० टक्के उत्पादन महाराष्ट्र करतो, त्यात पुण्याचा सिंहाचा वाटा आहे. इथली वाढती लोकसंख्या लक्षात घेता राहण्यालायक वातावरण निर्माण करणे, शिक्षण, आरोग्य, चांगल्या पर्यावरणाची उपलब्धता करून देणे गरजेचे आहे आणि त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे. पुण्यात पाणी मुबलक असताना वितरण प्रणालीतील दोषामुळे २५-३० टक्के पुणे तहानलेले असल्याचा विरोधाभास दिसत होता. म्हणून नागपूरच्या धर्तीवर २४x७ समान पाणीपुरवठा योजनेला बाणेर-बालेवाडी भागात प्रथमच सुरूवात करण्यात येत आहे. सुस-म्हाळुंगे हा वाढता भाग आहे. भविष्यात हा भाग मोठ्या प्रमाणात विकसित होणार आहे. इथे सुनियोजित विकास होत असतांना पिण्याच्या पाण्याची सोय करणे महत्वाचे आहे. म्हणून भविष्यातील लोकसंख्येचा विचार करून पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.