सिंधुदुर्ग प्रतिनिधी: बंगालच्या उपसागरात तयार झालेले मोचा हे चक्रीवादळ अत्यंत धोकादायक ठरू शकते. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे किनारपट्टी भागात ताशी १५० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. हे चक्रीवादळ बुधवारी संध्याकाळी किनारी भागाकडे सरकण्याची शक्यता आहे. १४ आणि १५ मे रोजी त्याचा वेग सुमारे १५० किमी प्रतितास असेल आणि बांगलादेश-म्यानमार मार्गे किनारी भागातून जाईल.हवामान खात्यानुसार, १२आणि १३ मे रोजी, पश्चिम बंगालच्या किनारी भागात, ज्यामध्ये कोलकाता, हावडा, हुगळी, उत्तर आणि दक्षिण २४ परगणा आणि पूर्व आणि पश्चिम मेदिनीपूर यांचा समावेश आहे, संध्याकाळपासून जोरदार वादळासह पाऊस पडेल. गुरुवारी हे चक्रीवादळ अधिक शक्तिशाली होईल आणि पावसाचा जोर वाढेल. मात्र, याचा सर्वाधिक परिणाम बांगलादेश आणि म्यानमारवर होण्याची भीती हवामान खात्याने व्यक्त केली आहे.