Home राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक समाजाच्या नविन चेहऱ्याच्या शोधात…

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक समाजाच्या नविन चेहऱ्याच्या शोधात…

126

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक सेलच्या विद्यमान प्रमुखांची कामगिरी बेदखल असल्यामुळे त्यांच्या जागी पक्षातील एखाद्या होतकरू तरुण चेहऱ्याला संधी देण्याचा मानस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाचा आहे. याच विषयावर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ‘सिल्व्हर ओक’ येथे सोमवारी बैठक झाली. या वैठकीत अल्पसंख्याक सेलच्या विद्यमान प्रमुखास बदलण्याचा निर्णय झाला असल्याचे समजते. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक समाजाच्या चेहऱ्याच्या शोधात आहे.मुंवईत पक्षाचा चेहरा असलेले आणि अल्पसंख्याक समाजाचे नेतृत्व करणारे माजी मंत्री नवाब मलिक हे सध्या अटकेत आहेत. पक्षाचे दुसरे नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर चौकशीची टांगती तलवार आहे. अल्पसंख्याक समाजातून पुढे आलेल्या नेतृत्वाला प्रदेश पातळीवर बळ देऊन अल्पसंख्याक समाजात शहरी आणि ग्रामीण भागात पक्षाचा पाया अधिक घट्ट करण्याची पक्षाची रणनिती आहे. मात्र विद्यमान प्रमुखांनी अपेक्षाभंग केल्याची पक्षात चर्चा आहे. नेमणूक झाल्यानंतर दोन वर्षे उलटल्यानंतर ही त्यांनी पक्षाविस्तारासाठी लक्षणीय काम केल्याची नोंद झालेली नाही. त्यामुळे त्यांना हटवून त्यांच्या जागी अल्पसंख्याक समाजातील एखाद्या उमद्या युवकास संधी दिली तर ती पक्षाच्या पथ्यावर पडेल.त्याचा पक्षाला लाभ होईल, अशी चर्चा सिल्व्हर ओकवरील बैठकीत झाल्याचे सांगण्यात येते.महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटच्या शिवसेनेने वंचित विकास आघाडी बरोबर युती केली आहे. वंचित विकास आघाडीचा अल्पसंख्याक समाजाच्या मतावर प्रभाव असल्याचा अंदाज मागील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांना पडलेल्या मतांवरून राष्ट्रवादीच्या जेष्ठ नेत्यांना आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची अल्पसंख्याक समाजावरील पकड सैल होऊ नये, यासाठी अल्पसंख्याक सेलचे प्रमुख पदाधिकारी बदलून वंचितला शह देण्याचा दुहेरी डाव साधण्याची पक्षाची रणनिती असल्याचे सूत्रांकडून सांगितले जाते.