मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): सिंधू पुत्र संतोष महाडेश्वर यांच्या शिवानी प्रकाशन मुंबईचा नववा वर्धापन दिन नुकताच मुंबई सायन येथील निसर्ग उद्यानात राज्यभरातील जवळपास ६० कवींच्या उपस्थितीत आणि विविध दोन कविता संग्रहांचे प्रकाशन आणि १२ साहित्यिकांना उत्कृष्ट वाङमयीन पुरस्कार देऊन व विविध कार्यक्रमांनी धुमधडाक्यात साजरा झाला.. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तिवरे गावचे सुपुत्र संतोष महाडेश्वर हे दरवर्षी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय असं कार्य करत असतात त्यांच्या संकल्पनेतूनच हा अनोखा कार्यक्रम मुंबई सायन येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद मान.विसुभाऊ बापट (कुटुंब रंगलंय काव्यात फेम) यांनी भुषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून मान.रविकिरण पराडकर (निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त), गोवा येथिल ज्येष्ठ साहित्यिक मान.प्रसाद सावंत, अभिनेत्री पुजा काळे आणि प्राध्यापिका व समाजसेविका डॉ.अलका नाईक इत्यादी लाभले होते.
सकाळी ०९:०० वाजता सुरू झालेल्या या रंगतदार सोहळ्यात विविध कार्यक्रम व राज्यस्तरीय पुरस्कार वितरीत करण्यात आले. ‘प्रेमार्पण’ आणि ‘जीवनाची शिदोरी‘ या दोन कविता संग्रहाचे प्रकाशन झाले, राज्यभरातून निवडलेल्या १२ साहित्यिकांना त्यांच्या साहित्यासाठी उत्कृष्ट वाङमयीन पुरस्कार देण्यात आले, “आई” या विषयावर घेतलेल्या काव्य स्पर्धेतील तीन उत्कृष्ट कवितांसाठी कवींना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले, शालेय विद्यार्थी दत्तक पालक योजने अंतर्गत ३० दानशूर व्यक्तींना सामाजिक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तर प्रधानमंत्री दत्तक पालकत्व योजने अंतर्गत दत्तक घेतलेल्या १५ दात्यांचा सामाजिक कार्य सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. अशाप्रकारे या सोहळ्यात जवळपास ११० साहित्यिक आणि सामाजिक पुरस्कार योग्य व्यक्तींना देण्यात आले.
कार्यक्रमातील उपस्थित कवी कवयित्रींनी आपल्या कविता सादर केल्या. सन्मा.प्रमुख पाहुण्यांनी शिवानी प्रकाशन व या सोहळ्याविषयी आपले विचार मांडले तर शिवानीचे संस्थापक संतोष म्हाडेश्वर यांनी शिवानी प्रकाशन तर्फे ज्या विविध योजना राबवून समाजातील गरजू विद्यार्थी, रूग्ण आणि वृद्धांसाठी जे अनमोल कार्य केले जाते त्याची माहिती देऊन या सामाजिक कार्यासाठी ज्यख सद्हृदयी, दानशूर व्यक्ती विश्वासाने मदत करतात त्या सर्वांचे तसेच संस्थेचे जे सभासद आर्थिक मदत करतात, वेळ देतात त्या सर्वांचे व कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या सर्वांचे आभार मानले. त्यानंतर सन्मा.अध्यक्ष विसुभाऊ बापट यांनी शिवानी प्रकाशन व कार्यक्रमाविषयी आपले अध्यक्षीय विचार मांडताना या संस्थेचे अध्यक्ष सिंधू पुत्र संतोष महाडेश्वर यांचे कार्य दीपस्तंबासारखे असून त्यांनी केलेली समाजसेवा आज सर्वांना आदर्श अशी आहे त्यांच्या या संस्थेलाही माझा मानाचा मुजरा. या सुंदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलनही तितकेच ओघवते, सुंदर असे सौ. निकिता शेठ यांनी केले. मान.अध्यक्ष महोदय, सर्व प्रमुख पाहुणे आणि उपस्थित साहित्यिक वृंदाना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सकाळी ०९:०० वा. सुरू झालेला हा कार्यक्रम सायं.०५:००वाजता संपला. कार्यक्रमा दरम्यान उपस्थितांना चहा – अल्पोपहार व जेवणाची सोय करण्यात आली होती.