Home क्राईम ओवळीये गावचे लवू रामा सावंत यांच्या खूनप्रकरणी त्यांचा सख्खा भाऊ अजित...

ओवळीये गावचे लवू रामा सावंत यांच्या खूनप्रकरणी त्यांचा सख्खा भाऊ अजित सावंतना संशयित म्हणून अटक करण्यात आली

95

सावंतवाडी– तालुक्यातील ओवळीये गावचे माजी उपसरपंच लवू रामा सावंत यांच्या खूनप्रकरणी त्यांचा सख्खा भाऊ अजित सावंत यांना संशयित म्हणून अटक करण्यात आली दुसऱ्या बाजूनेही पोलिसांचा तपास सुरू आहे. सावंत कुटुंबात कोणतेही वाद नव्हते तर मग खून नेमका का करण्यात आला तसेच यात आणखी कोणाचा सहभाग आहे का त्या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी या खून प्रकरणी पोलिसांनी अन्य चौघांची चौकशी केली. खून प्रकरणी भाऊ अजित सावंत याला अटक केली असली तरीही खूनाचे नेमके कारण शोधून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर असून त्या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.

आम्ही सर्व भाऊ एकत्र गुण्यागोविंदाने राहत होतो. आमच्यात कसलाही वाद किंवा भांडण नाही. त्यामुळे पोलीसांनी अटक केलेला संशयित अजित भावाचा खून करणे शक्यच नाही. त्याला नाहक गोवेले जात आहे. शेतमांगरासाठी तोडलेल्या झाडांमूळे काही लोकांशी झालेल्या वादातूनच ही घटना घडली असावी, असा संशय मृत लवू सावंत यांचा भाऊ अंकुश सावंत यांनी व्यक्त केला आहे. अजित सावंत याने आपण खून केलेला नाही असेच त्याचे म्हणणे आहे. केवळ सकृतदर्शनी मिळालेल्या पुराव्यामुळेच संशयित अजितला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे लवू सावंत यांचा खून नेमका प्रॉपर्टीच्या वादातून की अन्य कोणत्या कारणातून झाला हे तपासण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे टाकले आहे.खून प्रकरणी तपास करीत असताना श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. या पथकातील रेम्बो नावाच्या श्वानाने तब्बल चार वेळा संशयित अजित याच्या अंगावर झडप घातली. तसेच अन्य एकाच्या संशयताच्या अवतीभोवती हा श्वान घुटमळला. त्यामुळे पोलिसांनी अजित याचा तपास सुरू केला. पोलिसांनी अजितचे रक्ताळलेले कपडे व टोपी हस्तगत केली होती. तसेच त्याचे रक्ताने माखलेले चप्पलही ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, आपला भाऊ रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला दिसल्यानेच आपण त्याला उचलून बाजूला केले त्यावेळी आपल्या कपड्यांना टोपीला व चप्पलला रक्त लागले असल्याची माहिती त्याने पोलीसांना दिली. अजित घरी गेला त्याने तिथे आपले कपडे आणि टोपी बदलली. त्याशिवाय अजितच्या चपलावर रक्त साकाळले होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. अजित सावंत हा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असून खुनाची घटना उघडकीस आली त्या दिवशी सकाळी महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला झेंडावंदनासाठी तो ग्रामपंचायतीत गेला होता अशी माहितीही उपलब्ध झाली आहे. तसेच खून झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याने अनेक जणांना फोन करून याबाबतची माहिती दिली होती. तसेच पोलिसांनाही कळविण्याबाबत सुचवले होते अशी माहिती स्थानिकांकडून उपलब्ध झाली आहे.

तिसरा भाऊ अंकुश यांच्या म्हणण्यानुसार तसेच गावातील स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार या तिघा भावांमध्ये कोणताही वाद नव्हता. तर मग नेमका खून का झाला? याचेही उत्तर सापडायचे आहे. त्यामुळे संशयित अजितच्या मोबाईलचे लोकेशन पोलीस तपासणार असून ज्या रात्री खून झाला त्या रात्री अजित नेमका कुठे कुठे व कोणाच्या संपर्कात होता त्याची माहिती पोलीस घेत आहेत. संशयित अजित सावंत याच्यावर श्वानाने झडप घातली होती. त्याचबरोबर तेथे उपस्थित असलेल्या त्यांच्या एका नातलगाच्या आजूबाजूलाही श्वान घूटमळला होता. त्यामुळे त्यालाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र, चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिसरा भाऊ अंकुश सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतमांगरासाठी जी झाडे तोडली होती त्याबाबतची तक्रार काही लोकांनी वनविभागाकडे केली होती. यातून काही प्रमाणात वादही झाला होता. त्या वादात संबंधित नातलग सहभागी असल्याने त्या दृष्टीने ही पोलिसांचा तपास सुरू आहे.दरम्यान, बुधवारी सावंतवाडी पोलिसांनी या खून प्रकरणी चौकशीसाठी आणखी चार जणांना ताब्यात घेतले होते. मात्र, चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आले. सावंत कुटुंबीयांनी शेतमांगर बांधताना सामायिक जमिनीतील काही झाडे तोडली होती. याप्रकरणी गावातील सहा जणांनी त्यांच्याविरुद्ध वनविभागाकडे अर्ज करून ही झाडे जप्त करण्यास भाग पाडले होते.या सहा जणांवर लवू सावंत यांचे भाऊ अंकुश सावंत यांचा संशय आहे. त्यामुळे लवू सावंत यांचा खून पूर्ववैमनस्यातून, प्रॉपर्टीच्या वादातून की अन्य कोणत्या कारणातून झाला असावा याबाबतचा तपास करणे हे सावंतवाडी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे टाकले आहे. त्या दृष्टीने आमचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी दिली.

सावंत कुटुंबामध्ये वाद नव्हता: स्थानिकांची माहिती

ओवळीये गावचे माजी उपसरपंच राहिलेले मृत लवू सावंत यांचे कुटुंब गावातील एक प्रतिष्ठित कुटुंब म्हणून ओळखले जाते. त्यांच्या खून प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला अजित सावंत हा देखील ओवळीये ग्रामपंचायतीचा विद्यमान सदस्य आहे. तिसरा भाऊ अंकुश सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार सावंत कुटुंबीय गुण्यागोविंदाने एकत्र राहत होते. त्यांच्यात प्रॉपर्टी वरून व अन्य कोणत्याही कारणातून कसलाही वाद नव्हता. लहू सावंत यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. त्यांचा एक मुलगा पुण्यात तर दुसरा मुंबईत नोकरीला असतो. तर अंकुश सावंत यांचे दोन मुलगे मुंबईत नोकरीला असतात. संशयित अजित सावंत यांचा एक मुलगा मुंबईत तर दुसरा सैन्य दलात सेवेत आहे. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या अजित सावंत यांनी खून केला नसावा असेच सावंत कुटुंबियांचे व स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अशी माहिती सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी दिली.