सिंधुदुर्ग प्रतिनिधी: गेल्या काही मासांपासून आदमापूर (तालुका भुदरगड) येथील बाळूमामा देवस्थान मंदिराच्या विश्वस्त मंडळाच्या कारभाराच्या विरोधात भक्तांकडून धर्मादाय आयुक्तांकडे विविध तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्याचा निकाल २४ एप्रिलला लागला आणि यानंतर ‘बाळूमामा देवस्थान’चे विश्वस्त मंडळ विसर्जित करण्याचा आदेश देण्यात आला आहे. धर्मादाय सहआयुक्त शशिकांत हेर्लेकर यांनी याविषयीचा आदेश दिला आहे. मंडळ विसर्जित केल्यावर प्रशासक नेमण्यात आला असून अधीक्षकपदी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे तत्कालीन अध्यक्ष शिवराज नाईकवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाईकवाडे यांच्या समवेत प्रशासकीय मंडळावर निरीक्षक एम्.के. नाईक आणि निरीक्षक श्रीनिवास शेनॉय यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
१. आदमापूर येथील संत बाळूमामा मंदिरात विश्वस्त मंडळातील कारभार्यांनी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करत धर्मादाय आयुक्तांकडे ऑगस्ट २०२१ मध्ये याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. मंदिराच्या दान रकमेचा तत्कालीन कार्याध्यक्षांनी योग्य वापर केला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
२. तेथील विश्वस्तांमध्ये दोन गट पडले होते आणि दोन्ही गटांनी तेच मुख्य विश्वस्त असल्याचा दावा केला होता.
३. विश्वस्तांमधील आरोप-प्रत्यारोपांमुळे भक्तांमध्ये अप्रसन्नता पसरली होती आणि यावर तोडगा काढावा, अशी विनंती केली जात होती.