Home स्टोरी यंदाची भेंडवळची भविष्यवाणी जाहीर

यंदाची भेंडवळची भविष्यवाणी जाहीर

106

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: सकाळी सहा वाजता सूर्योदयाच्या वेळी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी यंदाची भेंडवळची भविष्यवाणी जाहीर केली आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर अठरा विविध प्रकारचे धान्याचा गोलाकार पद्धतीने मांडणी करण्यात आली. याच्या मधोमध एक खड्डा करून त्यामध्ये घागर ठेवण्यात आली होती. या घागरीवर पुरी, करंजी, पापड यासारखे विविध साहित्य ठेवण्यात आले होते. प्रत्येक साहित्य विविध घटकाचे प्रतीक मानली जातात आणि या मांडलेल्या घटात रात्रभरातून होणाऱ्या बदलांच्या आधारे दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हे संपूर्ण बदलाचे निरीक्षण करून पुढील वर्षभरातील पाऊस पाणी, पीक परिस्थिती सोबतच राजकीय सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर भाकीत वर्तवलं जातं.

भेंडवळच्या भविष्यवाणीनुसार यंदाचे वर्ष बळीराजासाठी सर्वसाधारण असे असणार आहे. भविष्यवाणीनुसार यंदा जून महिन्यात कमी पाऊस असेल, जुलैमध्ये साधारण तर ऑगस्टमध्ये प्रचंड पाऊस असेल असं सागण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना यंदाही अतिवृष्टीचा फटका बसेल असं भाकित भेंडवळच्या भविष्यवाणीत वर्तवण्यात आलं आहे.

राजकीय परिस्थितीबाबत भाकीत वर्तवताना राजा स्थिर असेल असं म्हटलं आहे. तर घट मांडणीत पहिल्यांदाच विंचू निघाल्याने देशात रोगराईची परिस्थिती असेल असं भविष्य वर्तवण्यात आलं आहे.