Home स्टोरी जय जय राम कृष्ण हरी! सार्थ हरिपाठ!

जय जय राम कृष्ण हरी! सार्थ हरिपाठ!

147

साधुबोध झाला नुरोनिया ठेला । ठायीच मुराला अनुभवे कापुराची वाती उजळली ज्योति । ठायीच समाप्ति झाली जैसी ।। मोक्षरेखें आला भाग्ये विनटला । साधूचा अंकिला हरिभक्त ।। ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी। हरि दिसे जनी आत्मतत्त्वी ।।

अभंगाचा भावार्थ: साधूंच्या संतांच्या उपदेशाचा बोध ज्याला अनुभवाने झाला तो न उरून उरतो – मुरतो म्हणजे स्वतःच्या अधिष्ठानात ‘मरुन’ उरतो. ज्याप्रमाणे कापूर अग्नीच्या स्पर्शाने अग्नीरूप होतो व नंतर तो अग्नीही नाहीसा होऊन त्याठिकाणी केवळ आकाश शिल्लक राहते, त्याप्रमाणे आत्मानुभवाचा प्रसाद झाल्यावर साधकाच्या जीवभावाचे ब्रह्मभावात रुपांतर होते. शेवटी तो ब्रह्मभाव सुद्धा विलयाला जाऊन केवळ नाम तेवढे शिल्लक राहते. जो साधूच्या अंकित आहे, त्याच्या उपदेशाप्रमाणे वागणारा आहे अशा हरिभक्तालाच मोक्ष मिळण्याचे भाग्य मिळते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्याला संतसंगतीची गोडी लागली त्यालाच हरि सर्वत्र भरलेला आहे असा अनुभव प्राप्त होतो.

जय जय राम कृष्ण हरी