भावेविण भक्ति, भक्तीविण मुक्ति । बळेविण शक्ति बोलू नये ।। कैसेनि दैवत प्रसन्न त्वरीत । उगा राहे निवांत शिणसी वाया ।। सायासे करिसी प्रपंच दिन निशी । हरिसी न भजसी कवण्या गुणे ।। ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे । तुटेल धरणे प्रपंचाचे ।।
अभंगाचा भावार्थ: – भक्तीत म्हणजे उपासनेत जर भाव नसेल तर उपासना खरी नव्हे आणि असल्या कवायती उपासनेने तुला मुक्ती प्राप्त होईल असे वाटत असेल तर कते बळ नसतांना शक्तीच्या गोष्टी बोलण्यासारखेच व्यर्थ आहे. मग देव कशाने प्रसन्न होईल व त्याच्या प्रसादाने मला कशी मुक्ती मिळेल? असा प्रश्न जर तुझ्या ठिकाणी निर्माण झाला असेल तर त्याचे उत्तर अगदी सोपे आहे. व्यर्थ शीण न करता तू प्रथम निवांत- शांत हो व श्रद्धेने अखंड हरिनामस्मरण कर. त्यानेच हरि प्रसन्न होऊन तुला मुक्तीचा प्रसाद मिळेल. रात्रंदिवस तू प्रपंचासाठी राबतोस, पण हरिचे भजन करण्यात मात्र आळस करतोस ते का बरे? ज्ञानदेव सांगतात तुला जर या प्रपंचाचे धरणे तुटावे-सुटावे असे वाटत असेल तर त्याला सोपा उपाय म्हणजे हरिच्या नामाचा अखंड जप करणे हाच होय.
जय जय राम कृष्ण हरी