Home स्टोरी दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी!

दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी!

87

त्रिगुण असार निर्गुण हे सार। सारासार विचार हरिपाठ ।। सगुण निर्गुण गुणाचे अगुण। हरिविण मन व्यर्थ जाय ।। अव्यक्त निराकार नाही ज्या आकार। जेथुनि चराचर त्यासि भजे ।। ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी । अनंत जन्मानी पुण्य होय ।।

अभंगाचा भावार्थ:- त्रिगुणात्मक प्रकृती व तिने निर्माण केलेले हे त्रिगुणात्मक जग सार आहे की असार आहे? किंवा त्या जगाचे अधिष्ठान असलेले निर्गुण परब्रम्ह हेच सार आहे? वगैरे गोष्टीबद्दलचा विचार तू करीत बसू नकोस कारण सारासार विचार करुनच संतांनी तुला हरिपाठाचा हरिनामाचा अमूल्य ठेवा दिला आहे. सगुण परमात्म्याला त्रिगुणात्मक प्रकृतीचा आश्रय घ्यावा लागतो, म्हणून तो कनिष्ठ आहे की निर्गुण परब्रम्ह हे अगुण, गुणातीत आहे, म्हणून ते श्रेष्ठ आहे, वगैरे विषयात, हरिनाम न घेता, मन घालशील तर तुझे जीवन व्यर्थ जाईल. म्हणून जे अव्यक्त व निराकार आहे व ज्याला आकार नाही आणि जेथून सर्व चराचर विश्वाची उत्पत्ती होते त्या तत्वाचे, हरिचे भजन कर ज्ञानेश्वर महाराज सांगतात की, जर तू हरिचे भजन करशील तर अनंत जन्माची पुण्याई फळल्यानंतर “रामकृष्ण ध्यानी रामकृष्ण मनी” अशी उन्मनी स्थिती प्राप्त होते ती स्थिती या जन्मातच तुला हरिनामस्मरणाने प्राप्त होईल.

जय जय राम कृष्ण हरी……