Home राजकारण बाळासाहेब थोरात पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देणार का? पुण्यातल्या नेत्याने दिली मोठी...

बाळासाहेब थोरात पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देणार का? पुण्यातल्या नेत्याने दिली मोठी माहिती

105

काँग्रेस पक्षांतर्गत नाराजी नाट्यात पुण्यातील पोट निवडणूक भरडली जाते का, असा सवाल उपस्थित होत आहे. पुण्यातील काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी उत्तर दिलंय.

प्रदीप कापसे, पुणेः नाशिक विधान परिषद निवडणुकीत राजकारण झाल्याचा आरोप करत काँग्रेस नेतृत्वावर नाराज झालेले बाळासाहेब थोरात आता पुण्यातील पोट निवडणुकीत काँग्रेसच्या पाठिशी उभे राहणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाशिकच्या निवडणुकीत मोठं राजकारण केल्याचा ठपका बाळासाहेब थोरात यांनी ठेवला आहे. काल काँग्रेसच्या विधीमंडळ पक्ष नेते पदावरून त्यांनी राजीनामाही दिला आहे. हायकमांडने त्यांचा राजीनामा स्वीकारल्या नसल्याचं म्हटलं जातंय. तसेच नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांचा हा वाद दिल्ली दरबारी पोहोचला असून लवकरच यातून तोडगा निघेल, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. मात्र या नाराजी नाट्यात पुण्यातील पोट निवडणूक भरडली जाते का, असा सवाल उपस्थित होत आहे. पुण्यातील काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी उत्तर दिलंय.

काँग्रेस नेते काय म्हणाले?

पुण्यातील काँग्रेस नेते मोहन जोशी म्हणाले, माझं आणि बाळासाहेब थोरात यांचं बोलणं झालंय. महाराष्ट्र काँग्रेस विधीमंडळाचे गटनेते आहेत. ते लवकरच प्रचारात शामील झालेले दिसतील. २-३ दिवसात डॉक्टरांचा सल्ला घेऊन ते प्रचारात उतरणार आहेत. काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारात ते उपस्थित राहतील.

पुण्यातील कसबा पेठ पोट निवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर उमेदवारी लढवत आहेत. बाळासाहेब थोरात नाराज असल्याने अप्रत्यक्षपणे ते भाजपचं समर्थन करणारं राजकारण करतील का, याकडे सर्वांचं लक्ष आहे. मात्र मोहन जोशी यांनी याविषयी स्पष्ट भूमिका मांडली.

माणिकराव ठाकरे काय म्हणाले?

बाळासाहेब थोरात-नाना पटोले यांच्या वादावर ज्येष्ठ काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी दिली आहे. बाळासाहेब थोरात यांच्या प्रकरणावर एच के पाटील यांचं लक्ष आहे. महाराष्ट्राचे ते प्रभारी आहेत. पक्ष नेतृत्व या संदर्भात निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत.

माणिकराव ठाकरे उद्या दिल्लीत

उद्या काही कामासाठी मला दिल्लीला बोलावलेलं आहे. या विषयाचा आणि दिल्ली दौऱ्याचा काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया माणिकराव ठाकरे यांनी दिली.

छगन भुजबळ काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांनीही काँग्रेसच्या अंतर्गत नाराजी नाट्यावर प्रतिक्रिया दिली. काँग्रेसमधलं वादळ हळू हळू शांत होईल. दिल्लीतले लोक वादावर मार्ग काढतील. यासाठी थोडा वेळ लागेल. दोन-चार दिवसात हे प्रकरण निवळेल. हे पक्षांतर्गत वादळ निश्चित संपेल, अशी आशा छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.