Home राजकारण नितीन गडकरी यांना धमकी देणाऱ्याकडून सातत्याने पोलिसांचे कौतुक!

नितीन गडकरी यांना धमकी देणाऱ्याकडून सातत्याने पोलिसांचे कौतुक!

96

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खामला येथील कार्यालयात फोन करत १० कोटी रुपयांची खंडणी आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या जयेशला धंतोली पोलिसांनी चौकशीसाठी विमानाने नागपुरात आणलं आहे. सध्या तो कोठडीत असून त्याच्या चौकशीदरम्यान त्याने ‘महाराष्ट्र पोलिस बहोत अच्छा है’ असे म्हणत पोलिसांचं कौतुक केलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देणाऱ्या जयेश पुजारी उर्फ कांथा याला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विमानाने मंगळवारी सकाळी नागपुरात आणलं. जयेशने बेळगावच्या कारागृहातूनच १४ जानेवारीला गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात तीन फोन कॉल्स केले. त्यातून त्याने शंभर कोटींची खंडणी मागितली होती.दोन महिन्यांनंतर २१ मार्चला सकाळी १०.४५ ते ११.१५ दरम्यान तीन फोन कॉल्स करून आरोपीने दहा कोटींची खंडणी मागितली. यासाठी एका युवतीच्या मोबाईलचा त्याने वापर केला होता. १४ जानेवारीला पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता जयेशचा पत्ता शोधला. मात्र, कायदेशीर अडचणी आल्याने त्याला अटक करता आली नाही.आता मात्र पोलिसांनी कर्नाटक पोलिसांच्या मदतीने अचानक बेळगाव कारागृहात झडती घेतली. कायदेशीर कारवाई करीत त्याला पकडून नागपुरात आणले. दरम्यान त्याची धंतोली पोलिसांकडून चौकशी करीत असताना तो अनेकदा वेगवेगळी माहिती देत असल्याची बाब समोर येत आहे. मात्र, त्याला राज्यात आणण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्याने तो सातत्याने पोलिसांचे कौतुक करताना दिसून येत आहे.