‘राहुल गांधी यांंच्यावर कारवाई करावी. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी राहुल गांधी यांना क्षमा मागण्यास भाग पाडले पाहिजे. तसे झाल्यासच ठाकरे गटाने घेतलेल्या भूमिकेला अर्थ प्राप्त होईल, असे विधान स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी पत्रकार परिषदेत केले. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी क्षमा मागितली, याचे पुरावे दाखवा’, असे आव्हानसुद्धा रणजित सावरकर यांनी राहुल गांधींना दिले. राहुल गांधी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करत असल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ते पुढे म्हणाले
१. राहुल गांधी हे सावरकरांचा वापर केवळ राजकीय लाभासाठी करत आहेत. ‘सावरकर हे हिंदुत्ववादाचे प्रणेते आहेत. त्यामुळे त्यांना विरोध केला, तर मुसलमान आपल्या पाठीशी उभे रहातील’, असे त्यांना वाटते.
२. काँग्रेससमवेत असणारे काही हिंदुत्वनिष्ठ पक्षही अंतर्गत राजकारणासाठी सावरकरांचा वापर करत आहेत. राजकीय लाभासाठी सावरकरांचा असा वापर करणे योग्य नाही.
३. ‘तत्कालीन विधान परिषदेचे सभापती जयंतराव टिळक हेसुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे अध्यक्ष होते. त्यामुळे सावरकरांचा आदर करणारे लोक काँग्रेसमध्येही आहेत; परंतु दुर्दैवाने ते सावरकरांसाठी आवाज उठवणार नसतील, काही कृती करणार नसतील, तर त्याला काहीही अर्थ नाही.
४. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना काँग्रेसच्या ‘शिदोरी’ मासिकातून सावरकरांवर अश्लील टीका झाली; परंतु उद्धव ठाकरे यांनी त्यावर कारवाई केली नाही. मी त्यांच्ंयाकडे पत्र लिहून कारवाईची मागणी केली होती, त्यांची भेटही घेण्याचा प्रयत्न केला होता; पण तेव्हा उद्धव ठाकरेंनी माझ्या पत्रालाही उत्तर दिले नव्हते, ते काँग्रेसवर अपकीर्तीची कारवाई करू शकले असते.
५. शरद पवार यांची अपकीर्ती करणार्या अभिनेत्रीवर लगेच कारवाई झाली, तिला १ मास कारागृहात पाठवले, मग वीर सावरकरांवर अश्लील भाषेत टीका केली, त्याचे काय ?