Home स्टोरी ड्रॅगन पॅलेसच्या परिसरात लवकरच २१४ कोटींच्या विविध कामांना सुरवात होणार! केंद्रीय मंत्री...

ड्रॅगन पॅलेसच्या परिसरात लवकरच २१४ कोटींच्या विविध कामांना सुरवात होणार! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा.

108

नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे ड्रॅगन पॅलेस हे बौद्ध विहार आहे. या विहाराची स्थापना १९९९ मध्ये करण्यात आली. हे विहार सुमारे १० एकर जागेवर बांधलेले आहे. या विहाराच्या बांधकामास जागतिक पुरस्कार मिळालेला आहे. येथील बुद्धमूर्ती ही एका सलग चंदनाच्या ठोकळ्यापासून बनविलेली एक सुंदर मूर्ती आहे. प्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस टेंपलमुळे कामठीसह नागपूर जिल्ह्याचे नाव जगभरात पोहोचले आहे. या ड्रॅगन पॅलेस टेंपलला भेट देण्यासाठी देश विदेशातील हजारो नागरिक येतात. या पॅलेसच्या परिसरात लवकरच २१४ कोटींच्या विविध कामांना सुरवात होणार आहे. त्यामुळे दोन हजार पेक्षा जास्त नागरिकांना रोजगार मिळणार असल्याचे केंद्रीय रस्ते, परिवहन व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

ड्रॅगन पॅलेस टेंपल

ड्रॅगन पॅलेस टेंपल परिसरात कर्मवीर दादासाहेब कुंभारे जन्मशताब्दी वर्ष प्रारंभ महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. सोबतच ड्रॅगन पॅलेसच्या विस्तीर्ण परिसरात रोजगाराभिमुख प्रकल्पांची उभारणी व्हावी. असे आवाहन गडकरी यांनी केले.यावेळी ड्रॅगन पॅलेस परिसरात कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यासोबतच ड्रॅगन पॅलेस मेट्रो स्टेशन, ड्रॅगन पॅलेस यात्री निवास, आंतरराष्ट्रीय पर्यटक अतिथीगृह आणि फूड कोर्टचेही उद्घाटन करण्यात आले.