Home स्टोरी जय जय राघवीर समर्थ! श्लोक क्रमांक १० आणि अर्थ

जय जय राघवीर समर्थ! श्लोक क्रमांक १० आणि अर्थ

113

सदा सर्वदा प्रीति रामी धरावी!

सुखाची स्वयें सांडी जीवी करावी!

देहेदु:ख ते सुख मानीत जावे!

विवेके सदा स्वस्वरूपी भरावे ||१०||

अर्थ: नेहमी श्रीरामाबद्दल प्रेम बाळगावे. सुखोपभोग टाळावा. देहाला पडणाऱ्या कष्टात सुख मानीत जावे आणि मनात नेहमी सारासार विवेक भरलेला असावा.या श्लोकात समर्थ म्हणतात, हे मना, सतत रामाबद्दल प्रेम बाळगून त्याची भक्ति करीत रहा. स्वार्थबुद्धीची हकालपट्टी झाल्यानंतर निर्विकार होशील तर तुझ्या ठायी श्रीराम प्रवेश करतील. तेव्हा तू त्यांना तिथे कायमपणे राहू दे, त्यांचे सतत स्मरण करीत रहा म्हणजे इतर कुठले विकारी विचार तिथे शिरकाव करू शकणार नाहीत. अशा अवस्थेत ऐहिक सुखाचे तुला विस्मरण होऊ लागेल. कदाचित तू विचलित झालास आणि अशा ऐहिक सुखाची आसक्ती निर्माण झालीच तर तू स्वत: निर्धारपूर्वक तिला टाळ. किंबहुना अशा सुखातून विरक्ति, सुटकारा, याला देहदु:ख न समजता तिला सुखाची भावनाच समज आणि अशी विवेकबुद्धी, म्हणजे विरक्तीतून देहाला पडलेले कष्ट सुखमय मानून, देहसुखाचा त्याग करून श्रीरामाच्या प्रेमात रहाणे हेच योग्य आहे, असा विचार तुझ्या अंतरी भरलेला असू दे.