
सावंतवाडी: ७७ व्या प्रजासत्ताक दिना निमित्त जिल्हा मुख्यालय येथे आयोजित मुख्य प्रजासत्ताक दिन सोहळ्यात राष्ट्रीय छात्र सेनेतील (NCC) उल्लेखनीय व उज्ज्वल कामगिरीबद्दल कळसुलकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडी येथील NCC अधिकारी गोपाळ गवस सर तसेच राष्ट्रीय स्तरावरील सुवर्णपदक विजेता सार्जंट अनंत अभिजीत चिंचकर यांचा सन्मान करण्यात आला.
हा सन्मान मा. ना. श्री. नितेशजी राणे, मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री, महाराष्ट्र शासन तसेच पालकमंत्री, जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या शुभहस्ते, मा. जिल्हाधिकारी श्रीम. तृप्ती धोडमिसे व मा. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान देऊन गौरव करण्यात आला.

गोपाळ गवस सर यांनी NCC माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, देशप्रेम व नेतृत्वगुण रुजविण्यासाठी सातत्याने केलेल्या कार्याची प्रशंसा यावेळी करण्यात आली. तसेच राष्ट्रीय स्तरावर रायफल शूटिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून जिल्ह्याचे नाव देशपातळीवर उज्वल करणाऱ्या सार्जंट अनंत अभिजीत चिंचकर याच्या यशाबद्दल विशेष गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमास अनंत चिंचकर यांचे पालक अनन्या अभिजीत चिंचकर उपस्थित होते. या दुहेरी सन्मानामुळे कळसुलकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी, ५८ महाराष्ट्र NCC बटालियन तसेच संपूर्ण शैक्षणिक व NCC क्षेत्रात आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.







