Home स्टोरी प्रथमेश इंगळे यांनी केले हडपीड ते अक्कलकोट पालखी सोहळ्याचे स्वागत.

प्रथमेश इंगळे यांनी केले हडपीड ते अक्कलकोट पालखी सोहळ्याचे स्वागत.

33

अक्कलकोट: कोकणातील देवगड तालुक्यातील हडपिड येथील श्री. स्वामी समर्थ मठाचे संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर यांनी आयोजित केलेल्या हडपिड ते अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या पालखी सोहळ्याचे सोमवारी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात आगमन झाले. यावेळी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश इंगळे यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी स्वामी भक्त नंदकुमार पेडणेकर व सहकाऱ्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपा वस्त्र प्रसाद देऊन सत्कार केला. यावेळी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे हे सलग पाचव्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्याबद्दल हडपीड मठाच्या वतीने नंदकुमार पेडणेकर यांनी महेश इंगळे यांचा पाच कोटी नामजप संकल्पनेचे कृपावस्त्र व सन्मान चिन्ह देऊन महेश इंगळे यांचा सन्मान केला.

यावेळी स्वामी भक्त नंदकुमार पेडणेकर यांच्या संकल्पनेतून हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठ देवगड, कोकणकट्टा – विलेपार्ले मुंबई, छोटा काश्मीर स्वामी मठ – आरे कॉलनी मुंबई, स्वामी मठ विक्रमगड यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या (५,५१,००,५५१) पाच कोटी एकावन्न लाख पाचशे एकावन्न लिखीत स्वामीनाम जपाच्या वह्या हा येथील श्री वटवृक्ष स्वामींच्या चरणी अर्पण करण्यात आल्या.

यानंतर देवस्थानच्या जोतीबा मंडपात भजन व सत्संग सोहळा पार पडला. यावेळी बोलताना हडपीड मठाचे संस्थापक नंदकुमार पेडणेकर यांनी श्री स्वामी नाम जपाचा प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून भाविकांना स्वामींचा कृपाशिर्वाद लाभावा, भाविकांना आध्यात्म व भक्तीची गोडी निर्माण व्हावी. घरबसल्या स्वामी भक्तांना नामजपाच्या माध्यमातून भाविकांचे जीवन स्वामीमय व्हावे व स्वामी नामाच्या फल प्राप्तीने सर्व मानव जातीचे कल्याण व्हावे याकरीता या स्वामी नामजपाचा संकल्प करून तो पुर्णत्वास नेऊन आज येथे श्रींच्या चरणी अर्पण केले असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी या हडपीड ते अक्कलकोट पालखी सोहळ्यास श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांचे विशेष सहकार्य लाभल्याबद्दल आभार मानले. प्रथम सदर नामजप वह्या पालखी समाधीमठ आणि अन्नछत्र मंडळ येथे नेऊन पूजन करण्यात आले. यावेळी देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, श्री स्वामी समर्थ हडपीडचे संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर, कोकण कट्टाचे अजितकुमार पितळे, छोटा काश्मीर आरे कॉलनी मठाचे अशोक गुराम, स्वामी भक्त अविनाश बायकर, प्रा.शिवशरण अचलेर, सचिन लोके, संतोष जाधव फुटाणे, प्रसाद पाटील, विद्याधर गुरव, विश्वनाथ देवरमनी, अमर पाटील, काका सुतार, दर्शन घाटगे, खाजप्पा झंपले, रविराव महिंद्रकर, विपूल जाधव, समर्थ स्वामी, श्रीकांत मलवे, धनराज स्वामी इत्यादी उपस्थित होते.

नगरसेवक महेश इंगळे यांची सामाजिक, धार्मिक व राजकीय वाटचाल ही स्वामी कृपेची इच्छा शक्ती आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही हडपीड मठासह मुंबई व तळ कोकणात स्वामी नामाचा प्रचार व प्रसार करीत आहोत. या माध्यमातूनच आज पाच कोटी एकावन्न लाख पाचशे एकावन्न लिखीत स्वामीनाम जपाचा संचय श्री वटवृक्ष स्वामीं चरणी अर्पण केला आहे.

महेश इंगळे यांच्या पाठीशी स्वामी कृपा तर आहेच, परंतू लिखीत नामजपांचा कृपाशिर्वादही त्यांना लाभावा याकरीता पाच कोटी नामजप संकल्पनेचे कृपावस्त्र व सन्मान चिन्ह देऊन महेश इंगळे यांचा सन्मान केला आहे.

नंदकुमार पेडणेकर – संस्थापक सचिव श्री स्वामी समर्थ मठ, हडपीड, देवगड.