Home शिक्षण प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी मराठी विश्वकोश नोंद लेखन कार्यशाळेचे आयोजन.

प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी मराठी विश्वकोश नोंद लेखन कार्यशाळेचे आयोजन.

272

सिंधुदुर्ग: मराठी भाषेच्या प्रचार प्रसार व संवर्धनासाठी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाकडून मराठी विश्वकोशाच्या अद्यावतीकरणाचे कार्य सुरू असून या अनुषंगाने मराठी विश्वकोशातील नोंदीच्या लेखनासाठी महाराष्ट्रभर कार्यशाळा आयोजित केल्या जातात. त्यामध्ये मराठी विश्वकोशाकरिता नोंदीचे लेखन कसे करायचे? याचे मार्गदर्शन केले जाते. तसेच इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांच्या मराठी पाठ्यपुस्तकात मराठी विश्वकोशावर आधारित एक धडा आहे त्याला अनुसरून मागील तीन वर्षापासून इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळातर्फे विश्वकोश ज्ञानसंवर्धन स्पर्धा याचे आयोजन केले जाते. ही स्पर्धा यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेचे मार्गदर्शन संबंधी शिक्षकांना सदर कार्यशाळेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे यानिमित्ताने विश्वकोश व कुमार विश्वकोश यांची माहिती व विश्वकोश नोंद लेखन कार्यशाळा याचे आयोजन महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राणी पार्वती देवी हायस्कूल सावंतवाडी येथे बुधवार दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी आयोजित केलेली आहे.

सदर कार्यशाळेस श्रीमती वृंदा कांबळे (सदस्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ) डॉक्टर शरयू असोलकर व श्री वामन पंडित, श्री महादेव देसाई (सदस्य महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ) तसेच श्री वर्षा देवरुखकर (संपादकीय सहाय्यक महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ) श्री ललित कुडमते (सहाय्यक सचिव महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ) तसेच भरत गावडे (सदस्य, राज्य मराठी भाषा विभाग निर्मिती मंडळ) मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक शिक्षक उपस्थित राहणार आहे.