बेंगळुरू: सुप्रसिद्ध २६ वर्षीय अभिनेत्री नंदिनी सीएम हिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बेंगळुरू येथील राहत्या घरी रविवारी तिचा मृतदेह आढळून आला. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली असून, त्यात अभिनेत्री नंदिनीने आपल्या टोकाच्या निर्णयासाठी स्वतःच्याच आई-वडिलांना जबाबदार धरल्याचा उल्लेख केला. मिळालेल्या माहितीनुसार, नंदिनी रविवारी रात्री तिच्या खोलीत मृतावस्थेत आढळली. तिने फोन उचलणे बंद केल्याने तिच्या एका मित्राने पीजी व्यवस्थापकाला माहिती दिली. त्यानंतर दरवाजा तोडला असता ती खिडकीच्या ग्रिलला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली.
सुसाईट नोटमध्ये लग्नासाठी दबाव: तिचे आई-वडील तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होते, असे तिने पत्रात म्हटले आहे. मानसिक खच्चीकरण: “माझं कोणीच ऐकत नाही,” अशी खंत तिने व्यक्त केली आहे. ती डिप्रेशनमध्ये होती आणि तिला या लग्नाच्या दबावामुळे मानसिक त्रास होत होता. तसेच सरकारी नोकरीची संधी नाकारून तिने अभिनय क्षेत्र निवडले होते, परंतु अपेक्षित यश मिळत नसल्याने ती हताश झाली होती.
अभिनेत्री नंदिनी सीएम मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारत असे. त्यामुळे तिच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. अभिनेत्री नंदिनीच्या आत्महत्येमुळे तिच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. ‘जीवा हूवागिदे’, ‘संघर्ष’ आणि ‘गौरी’ या मालिकांमुळे अभिनेत्री यशाच्या शिखरावर पोहोचली होती.
बेंगळुरू पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून सुसाईड नोटच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. तिच्या आई-वडिलांची आणि जवळच्या मित्रांची चौकशी केली जाण्याची दाट शक्यता आहे.







