Home स्टोरी मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटलचे भवितव्य आता बांधकाम विभागाच्या अहवालावर…! गुरुवारी सुनावणी:जिल्हा शल्यचिकित्सकांचे प्रतिज्ञापत्र निर्णायक.

मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटलचे भवितव्य आता बांधकाम विभागाच्या अहवालावर…! गुरुवारी सुनावणी:जिल्हा शल्यचिकित्सकांचे प्रतिज्ञापत्र निर्णायक.

95

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी ता.बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले-देसाई, फिजीबिलीटी रिपोर्ट(व्यवहार्यता अहवाल), जिल्हाशल्यचिकिसक डॉ. श्रीपाद पाटील यांचे प्रतिज्ञापत्र यावर आता सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटलचे भवितव्य अवलंबून आहे.

अभिनव फाऊंडेशनने दाखल केलेल्या जनहित याचिका प्रकरणी उद्या बुधवारी (ता.17) जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पाटील यांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश आहेत. तत्पूर्वी रविवारी आणि सोमवारी भूमी अभिलेख विभागा मार्फत जागेची मोजणी करण्यात आली. टाऊन प्लानिंगच्या नकाशा नुसार आरक्षण क्रमांक पाच अ हा भूखंड मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटल आणि मेडिकल काँलेजसाठी आरक्षित आहे. ती जागा नेमकी किती आहे; त्याची मोजणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांनी भूमी अभिलेख विभागाला दिले. त्यानुसार रविवारी व सोमवारी युध्द पातळीवर भूमी अभिलेख विभागाने मोजणी करुन अहवाल देण्याची तयारी केली.

आता बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले-देसाई यांनी आज प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. यावेळी भूमी अभिलेख विभागाचे उप अधीक्षक विनायक ठाकरे, बबलू गवस, नगरपालिका कर्मचारी श्री. नासीर, विनायक जाधव उपस्थित होते.

आरक्षित जागा मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटल करीता योग्य आहे अथवा कसे, याबाबतचा व्यवहार्यता अहवाल बांधकाम अधिकारी इंगवले-देसाई देणार आहेत. त्या आधारे प्रतिज्ञापत्र जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील हे दाखल करणार आहेत. या दोन्ही दस्तऐवजांवर गुरुवारी ता.18 सुनावणी होणार आहे. त्यामुळे बांधकाम च्या इंगवले-देसाई काय अहवाल देतात आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील प्रतिज्ञापत्राव्दारे न्यायालया समोर काय मांडतात त्यावर आता मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटलचे भवितव्य अवलंबून आहे. कारण लगेचच गुरुवारी 18 डिसेंबर ला यावर न्यायमूर्ती मकरंद कणिँक आणि न्यायमूर्ती अजित कडेथानकर यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.

सिंधुदुर्ग वासियांच्या आरोग्य प्रश्नाबाबत आता प्रशासनाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटलची सध्याची जागा सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालय आहे. याबाबत न्यायालयात केस प्रलंबीत आहे. त्यामुळे जिल्हावासियांच्या आरोग्याचा प्रश्न अडकून राहू नये म्हणून अभिनव फाऊंडेशनने सावंतवाडी शहरातील पर्यायी आरक्षित जागा न्यायालयात सूचवली. त्या जागेस आता हिरवा कंदील मिळाल्यास मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटलचा मार्ग मोकळा होईल.