Home स्टोरी रस्त्यात सापडलेला मोबाइल केला मूळ मालकाकडे सुपूर्द!

रस्त्यात सापडलेला मोबाइल केला मूळ मालकाकडे सुपूर्द!

87

देवगड प्रतिनिधी:          मुणगे ते देवगड रस्त्यावर सापडलेला मोबाइल पुन्हा मूळ मालकाचा शोध घेऊन परत केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. मोबाइल मूळ मालकाकडे परत करण्यामध्ये मुणगे तिठा येथील श्री भगवती झेरॉक्स आणि स्टेशनर्सचे मालक आशिष आईर यांनी महत्वाची भूमिका बजावली. मिठबाव येथील अनघा फाटक यांचा सुमारे पंधरा हजार रुपये किमतीचा अँड्रॉइड मोबाइल हिंदळे व मुणगे गावच्या सीमेवर तीन धोंडा येथे प्रवासा दरम्यान रस्त्यात पडला होता. सदर मोबाइल हिंदळे येथे आपल्या कामासाठी गेलेल्या पत्रकार झुंजार पेडणेकर यांना रस्त्यात दिसला. मसूरे येथे त्यांना यायचे असल्याने मोबाइल मालकाला पुन्हा मसूरे येथे मोबाइल न्यायला यायला लागू नये यासाठी त्यांनी सदर मोबाइल मुणगे येथील आशिष आईर यांच्या जवळ सुपूर्द करत मालकाचा शोध घेण्यास सांगितले. दरम्याच्या कालावधीत अनघा फाटक या वायंगणी येथील पेट्रोल पंपावर आल्या असता त्यांना मोबाइल गहाळ झाल्याचे लक्षात आले. दुसऱ्या मोबाइल नंबर वरुन त्यांनी स्वतःच्या मोबाइलला कॉल केला असता आशिष आईर यांनी सदर मोबाइल मुणगे येथे असल्याचे सांगितले. फाटक यांनी आशिष आईर यांच्या दुकानात येऊन मोबाइल स्वीकारताना आभार सुद्धा मानले. मोबाइल परत करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आशिष आईर यांचे कौतुक होत आहे.