सावंतवाडी प्रतिनिधी: कै. प्रा.उदय रमाकांत खानोलकर वाचनालय, मळगाव हे ज्ञानसेवेची २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या वर्षात प्रवेश करत आहे. हे रौप्यमहोत्सवी वर्ष वाचनालय मोठ्या दिमाखात साजरे करत आहे. ५ ऑक्टोबर हा दिवस कै.प्रा.उदय खानोलकर यांचा स्मृतिदिन आणि वाचनालयाचा वर्धापनदिन म्हणून साजरा केला जातो.
सावंतवाडी तालुक्यातील मळगाव सारख्या निसर्गरम्य अशा छोट्याशा गावात सन २००१ साली मळगावातील वाचनाप्रेमींनी वाचनालयाची स्थापन केली आहे. अगदी नगण्य अशी १०००/१२०० ची ग्रंथसंपदा घेऊन सुरुवात केलेलं हे वाचन मंदिर इतर “ब” गटापर्यंत पोहोचले आहे. अगदी छोट्याशा जागेत सुरू झालेल्या वाचनालयाचे आज सुसज्ज असे वाचनमंदीर झाले असून वाचनमंदिराची इमारत डौलाने उभी राहिली आहे. यामध्ये स्वतंत्र महिला विभाग, बाल विभाग, संगणक कक्ष, अभ्यासिका आणि उत्तम दर्जाच्या प्रशस्त अशा सभागृहाने वाचनमंदीर समृद्ध झाले आहे.
वाचनमंदीर म्हणजे ज्ञानाचा अखंड वाहता निर्मळ झरा असा हा खळाळत वाहणारा ज्ञानाचा झरा मळगाव गावात गेली २४ वर्षे वाचकांची वाचण्याची तृष्णा अखंडपणे शमवित असून वाचन संस्कृतीचे जतन करत आहे. त्यामुळे हे वाचनमंदीर उभे राहण्याकरिता ज्या दात्यांनी सढळ हस्ते दान देऊन आपल्या दातृत्वाचा दाखला दिला त्या दातांना विसरून नक्कीच चालणार नाही. त्या दात्यांच्या दातृत्वामुळेच आज मळगाव गावात कै.प्रा.उदय रमाकांत खानोलकर वाचनालयाचा भव्यदिव्य अशी इमारत भक्कमपणे उभी आहे. या वाचनालयासाठी दात्यांनी रोख रक्कम, ग्रंथसंपदा स्वरूप, वस्तूरूप मदत केलेली आहे आणि आजही करत आहेत. म्हणूनच मळगाव सारख्या गावात हे भव्य व ग्रंथसंपदेने समृद्ध असे वाचनमंदिर डौलाने उभे आहे.
वाचनमंदिर म्हटलं की तिथे ज्ञान समृद्ध करणारे विविध विषय आपसुकच येतात, आणि हे वाचनमंदीर देखील नेहमीच विविध कार्यक्रम सादर करत असते. यामध्ये महिलांसाठी महिलादिनाचे औचित्य साधून विविध स्पर्धा, अभिवाचन, विद्यार्थी वर्गासाठी बालवाचकांसाठी वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन, निबंधस्पर्धा , बालवाचक शिबिर, कुमार वाचक शिबिर यासारखे कार्यक्रम सतत राबवले जातात जेणेकरून वाचनसंस्कृती जपली जाते एवढेच नव्हे तर वृद्धिंगत होत जाते आणि यासाठी हे वाचनमंदीर सतत कार्यरत असते. २२,७०० एवढी मोठी ग्रंथसंपदा या वाचनमंदिरची असल्याने १०३ महिला वाचक आणि ११० बालवाचक असे ३६४ वाचक या ग्रंथसंपदेचा लाभ घेत असून वाचकांची वाचन करण्याची भूक भागविण्याचे कार्य हे वाचनमंदिर समर्थपणे करीत आहे. वाचनालयात विविध प्रकारची दैनिके, साप्ताहिके, पाक्षिके, मासिके, त्रैमासिके अशा नियतकालिकांचा वाचक लाभ घेत असतात. यामध्ये विशेष भर घालून दिवाळीचा जणू अक्षरांच्या फराळाची मेजवानी देतात ते दिवाळी अंक..! चरित्र, कथा, कादंबरी, ललित आणि दुर्मिळ असे वाचन संदर्भ ग्रंथ वाचनालयाला आणखी समृद्ध करतात.
वाचनमंदिर हे प्रत्येक गावच्या संस्कृती आणि सुशिक्षिततेचे प्रतीक तसेच गावची शान म्हणून ओळखले जाते. वाचनमंदिर अधिक समृद्ध तेव्हाच बनते जेव्हा विद्यार्थी वाचनालयातील अभ्यासिकेचा लाभ घेतात. या वाचनालयात एमपीएससी, युपीएससी सारख्या सर्वात कठीण वाटणाऱ्या परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी येत असतात.पोलिस प्रशिक्षणातून राबविलेल्या अभ्यासक्रमातून येथून तीन विद्यार्थिनी उत्तीर्ण होत यशस्वी झाल्या. नक्कीच हे वाचनमंदिरचे देखील यश आहे.
आज वाचनमंदिरचे रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करताना मागील २४ वर्षांचा इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो आणि मनांगणावर हर्षानंद दाटून येतो हे मात्र खरे..! या २४ वर्षांच्या काळात वाचन मंदिराने अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. यामध्ये महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार, औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील ग्रंथालयातर्फे देण्यात येणारा लिलाबाई सिताराम अग्रवाल स्मृती राज्य पुरस्कार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रंथालय संघातर्फे दिला जाणारा कृष्ण ग्रंथालय पुरस्कार यांचा समावेश आहे.
आज या वाचन मंदिराला ‘ अ’ वर्ग प्राप्त करणे, डिजिटल लायब्ररी करणे ही प्रमुख आणि अत्यंत महत्त्वाची कामे प्राधान्याने करायची आहेत. यासाठी प्रेमाने नेटाने वेळ पडल्यास स्वखर्चाने नित्यनेमाने कार्य करणारे कार्यकारी मंडळ, देणगीदार, हितचिंतक आणि कर्मचारी वर्ग यांच्यामुळे वाचन मंदिर दिवसेंदिवस आपल्या कार्यात अधिक प्रगल्भ होत आहे. त्यामुळेच २४ वर्षांची ही वाटचाल यशस्वी झाली आहे. अशा सर्व साहित्य संपन्न वाचनालयाच्या कार्याची दखल वाचनालयास भेट देणाऱ्या अनेक नामवंत व्यक्तींनी घेऊन वाचनालयाचे तोंड भरून कौतुक केले आहे. त्यामुळेच मळगाव सारख्या छोट्याशा गावात वाचकांच्या वाचन छंदाची आवड जोपासताना आणि वाचन संस्कृती जतन करून वृद्धिंगत करताना आम्हाला अत्यानंद होत आहे.
सौ.स्नेहा महेश खानोलकर-: कार्यवाह कै. प्रा.उदय रमाकांत खानोलकर वाचनमंदिर मळगाव.







