Home स्टोरी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान कडून घेण्यात आलेला कृतज्ञता सोहळा...

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान कडून घेण्यात आलेला कृतज्ञता सोहळा उत्साहात संपन्न.

167

सावंतवाडी प्रतिनिधी: १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नगरपरिषदेतील कंत्राटी सफाई कामगार व उपजिल्हा रुग्णालयातील सफाई कामगार असे मिळून 100 सफाई कामगारांचा सत्कार करून त्यांना शिधावाटप केले. तसेच हॉस्पिटल येथील महिला सफाई कामगारांना मायेची साडी देण्यात आली. तर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी संस्थेच्या रूपा गौंडर (मुद्राळे) यांच्या स्वखर्चाने भेटवस्तू देण्यात आल्या.

संस्थेचे सल्लागार शैलेश पै यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमा प्रसंगी ते म्हणाले हा सेवाभावी उपक्रम आता दर वर्षी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाला या आपल्या स्वच्छता दूतांसाठी घेतला जाईल. असे त्यांनी घोषित केले. कारण या शहराचे तेच खरे हिरो आहेत. जे स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून आपलं आरोग्य व सावंतवाडी शहर स्वच्छ ठेवतात. तर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या अनेक सेवाभावी उपक्रमांचे त्यांनी तोंड भरून कौतुक केले. ते म्हणाले या शहरातच नव्हे तर आजूबाजूच्या शहरात देखील अशा पद्धतीने काम कोणीच करत नाही तेवढं हे हे लोक 24 तास करतात. खरंच मला यांच्या कामाच नवल आणि आश्चर्य वाटतं.

रेस्क्यू टीमचे अध्यक्ष बाबल अल्मेडा गेली 40 वर्ष ते सामाजिक क्षेत्रामध्ये जीव तोडून काम करत आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन संस्थेमार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला. आरोग्य यंत्रणामधील 108 रुग्णवाहिका वरील 24 तास सेवा देणारे डॉक्टर दानवे यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी ते म्हणाले 24 तास ड्युटी करून मी फार हैराण झालो होतो पाच महिन्यात पाचशेहून अधिक रुग्ण गोवाबांबुळी येथे 108 रुग्णवाहिकेने मी नेले सततच्या ड्युटी मुळे सदर काम सोडण्याचे ठरवले होते त्यावेळी रवी जाधव मला भेटले व तुम्ही रुग्णांना खूप चांगली सेवा देत आहात. आपण असा विचार करू नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत. त्यांनी माझा आत्मविश्वास वाढवला म्हणून आजपर्यंत मी या सेवेत आहे.

108 रुग्णवाहिका वरील सावंतवाडी शहरातील धैर्यशील शिर्के यांच्यासह रामचंद्र निकम आणि बुधाजी जाधव यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच 24 तास सेवा देणारे सिटीस्कॅन मॅनेजमेंटचे मॅनेजर प्रथमेश परब यांचाही सत्कार करण्यात आला. दिव्यांग प्रशिक्षण केंद्र चालवणाऱ्या रूपाली पाटील तसेच काळसे पंचक्रोशी अपंग संस्थेचे अध्यक्ष विनोद धुरी यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच शहरातील दानशूर व्यक्तिमत्व जे सामाजिक बांधिलकीला सामाजिक प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्यास हातभार देतात ते महालक्ष्मी सुपर बाजारचे मालक रामकृष्ण कोंडीयाल, चेतन बँगल स्टोअर्स चे मालक चेतन अशोक गुप्ता व उभा बाजार येथील सुराणा इंटरप्राईजेस यांचाही सत्कार करण्यात आला.

सावंतवाडी शहराच्या नाट्य व सिनेमा क्षेत्रामध्ये शहराच मानबिंदू उंचवणाऱ्या अभिनेत्री लेखिका व कवयित्री कल्पना बांदेकर यांचाही सत्कार करण्यात आला तसेच जेष्ठ नागरिक माजी अध्यक्ष अरुण मेस्त्री यांचाही सत्कार करण्यात आला सामाजिक क्षेत्रामध्ये भारत भूषण पुरस्कार प्राप्त या संस्थेचे धडाडीचे कार्यकर्ते लक्ष्मण कदम यांचाही सत्कार करण्यात आला.

तसेच या संस्थेच्या कार्यक्रमासाठी गोविंद चित्र मंदिर हॉल चालक व समाजसेवक संदीप कोटकर यांनी या सेवाभावी उपक्रमासाठी कमी भाड्यामध्ये हॉल उपलब्ध करून दिला तसेच उपस्थितितांची चहा पाण्याची देखील व्यवस्था केली. संस्थेच्या अध्यक्षांनी त्यांचे मनसोक्त आभार मानून त्यांचा सत्कार केला.

या कार्यक्रमा प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक सुभाष गोवेकर सर व प्रमुख पाहुणे शैलेश पै यांनी उपस्थितांना संबोधित केले.संस्थेचे अध्यक्ष सतीश बागवे, उपाध्यक्ष शैलेश नाईक, सचिव समीरा खालील, कार्याध्यक्ष संजय पेडणेकर, सदस्य रूपा गौंडर (मुद्राळे), शरदिनी बागवे, लक्ष्मण कदम,शेखर सुभेदार, श्यामराव हळदणकर, हेलन निबरे व रवी जाधव या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी बहुमूल्य कामगिरी केली.

संस्थेचे अध्यक्ष सतीश बागवे यांनी आपल्या संस्थेमार्फत संकटात असलेल्यांना अनाथांना गोरगरिबांना जी सेवा दिली जाते ती सेवा अनंतकाळ टिकण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी ग्वाही दिली. तर संस्थेचे उपाध्यक्ष शैलेश नाईक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून सफाई कामगार तसेच दिव्यांगांच्या सदा पाठीशी आहोत असे सांगून त्यांचा आत्मविश्वास वाढवला.

प्रसंगी सत्कार प्रतिउत्तर म्हणून सफाई कामगार प्रतिनिधी बाबू बरागडे यांनी सामाजिक बांधिलकीच्या या उपक्रमाचे कौतुक करून म्हणाले आजपर्यंत आमची कोणी एवढी दखल घेतली नाही तेवढी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान नेहमीच घेते प्रत्येक संकटात प्रत्येक आमच्या न्याय हक्काच्या आंदोलनात ते सहभागी असतात असे ते म्हणाले.

समाजसेवेचा झेंडा हाती घेऊन गोरगरीब – अनाथांना आपल्या अजेंड्याखाली घेऊन चालणारी ही संस्था आहे “जिथे कमी तेथे आम्ही”याच वाक्याप्रमाणे ही संस्था शहरांमध्ये सातत्य ठेवून काम करत आहे हे एवढं सोपं नसतं असे उद्गार अभिनेत्री लेखिका कल्पना बांदेकर यांनी काढले.

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान शहरातील इतर सेवाभावी कार्य करणाऱ्या संस्थांचा आदर्श घेऊन या शहरांमध्ये निस्वार्थ व प्रामाणिकपणे लोकांना सेवा देण्याचे काम करत आहे आणि या संस्थेच्या सेवाभावी कार्याची दखल आज सिंधुदुर्गातच नव्हे तर महाराष्ट्रातपण घेतली जाते सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे काम पाहून दानशूर व्यक्ती या संस्थेच्या सेवाभावी उपक्रमाला हातभार लावण्यासाठी पुढे सरसावत आहेत त्यांचे आभार या संस्थेचे अध्यक्ष सतीश बागवे यांनी मानले आहे.