सावंतवाडी प्रतिनिधी: जर येथे रुग्णांचीच कोणाला कदर नाही तर आंदोलनकर्त्यांच्या आंदोलन – उपोषणाचं कोणाला काय पडलंय. अपघात ग्रस्त युवकांना वेळेवर उपचार न मिळाल्याने नातेवाईकांच्या डोळ्यासमोर त्यांना प्राण सोडावा लागतो तर कालचीच घटना एक्सीडेंट तसेच निपाणी येथील २३ वर्षाच्या युवकाला हृदयाचा झटका आला. त्यावेळी तो सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय मध्ये चालत आला. पण वेळेवर फिजिशियन उपलब्ध नसल्यामुळे त्यालाही प्राण गमवावा लागला. अशा कित्येक घटना या हॉस्पिटलमध्ये घडल्या आणि घडत आहेत. खरंच ज्याचा होता त्याचा तो गेला. कोणाला काय फरक पडला? आणि यापुढे पडणारही नाही. येथील नागरिकच सगळं काही सहन करत आहे. मग आंदोलने उपोषणे कोणासाठी करायची? म्हणून ठरवलं यापुढे दोष कोणालाचं द्यायचा नाही. ना येथील डॉक्टरांना ना शासनाला ना येथील राजकीय मंडळींना.
आज येथे जो तो आपलं नाव आणि उंची मोठी करण्यात व्यस्त आहे. परंतु सावंतवाडीतील आरोग्य समस्या संदर्भात येथील एकही राजकीय पुढारी जरा सुद्धा गंभीर नाही. हे येथील नागरिकांचे व रुग्णांचे दुर्दैवचं म्हणावे लागेल. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून हॉस्पिटलमध्ये गेली सहा वर्ष २४ तास रुग्णांना सेवा देत असताना समोर रुग्णांचे प्राण जातात हे पाहत असताना ते आपलेचं कुणीतरी आहे असा भास होतो आणि डोळे पाणावतात.
आम्ही फक्त रुग्णांना सेवा देऊ शकतो पण रुग्णांचा प्राण वाचवू शकत नाही ते काम डॉक्टरांच आहे. पण कुठे आहेत डॉक्टर? डॉक्टरांची वाट पाहून पाहून कधी हॉस्पिटलमध्ये तर कधी गोवा बांबोळीला जाताना रस्त्यावरच आमचे बिचारे रुग्ण प्राण गमावतात. म्हणूनच आज विचार केला. ज्या ठिकाणी रुग्णांना योग्य उपचार मिळत नाही. त्यांना जीव गमवावा लागतो व आपण त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही. तेव्हा अशा कमिटीवर राहण्याचा आम्हाला मुळीच हक्क नाही. भले आम्ही कितीही रुग्णसेवा करू म्हणून लवकरच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून रुग्ण कल्याण नियमक समिती सदस्य पदाचा राजीनामा देण्यात येणार आहे. परंतु आमच्या रुग्णांना सेवा देण्याबाबत कुठच्याही प्रकारची काटकसर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून केली जाणार नाही.. याची नेहमी दक्षता घेतली जाईल. असे रवी जाधव यांनी सांगितले.







