कुडाळ प्रतिनिधी: कोकण कृषी विद्यापीठ, दापोली संलग्न उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथे ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. ‘योगा फॉर वन अर्थ, वन हेल्थ’ ही यंदाची संकल्पना ठेवण्यात आली होती, जी व्यक्ती आणि पर्यावरण या दोघांच्या आरोग्याचे नाते अधोरेखित करणारी आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.०० वाजता महाविद्यालयाच्या बेसमेंट हॉलमध्ये झाली. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. सौ. प्रियंका पाटाडे (आयुर्वेदाचार्य, कुडाळ) उपस्थित होत्या. आपल्या प्रभावी मार्गदर्शनात त्यांनी योगाभ्यासामुळे मिळणारी मानसिक शांतता, शारीरिक तंदुरुस्ती आणि भावनिक स्थैर्य याविषयी सविस्तर माहिती दिली व विद्यार्थ्यांना दररोज योग करावा असा संदेश त्यांनी दिला
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रणजित देव्हारे यांनी आपल्या भाषणात योगाचा इतिहास, त्याचे वैज्ञानिक महत्त्व, तसेच आजच्या धकाधकीच्या जीवनात योगाचे स्थान यावर सखोल विचार मांडले.
कार्यक्रमात कॉमन योगा प्रोटोकॉल, योग प्रदर्शन, जागरूकता सत्र आणि प्रेरणादायी मार्गदर्शन घेण्यात आले. या उपक्रमात एकूण १३० सहभागी होते, ज्यामध्ये ३४ राष्ट्रीय छात्र सेना (NCC) कॅडेट्स, ३० राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्वयंसेवक, इतर विद्यार्थी व महाविद्यालयीन कर्मचारी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे सुयोग्य आयोजन प्रा. हर्षवर्धन वाघ (NCC प्रमुख) व डॉ. गिरीश उईके (NSS कार्यक्रम अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. नेहा तेंडुलकर (तृतीय वर्ष विद्यार्थिनी) हिने उत्तमरित्या पार पाडले, तर कु. समृद्धी कुंभार (तृतीय वर्ष विद्यार्थिनी) हिने आभारप्रदर्शन केले.
कार्यक्रमाचा समारोप “वन अर्थ, वन हेल्थ” या विषयावर आधारित चिंतनाने झाला, ज्यामध्ये योग ही केवळ व्यक्तिस्वास्थ्याची नव्हे तर पर्यावरणाच्या आरोग्याशी जोडलेली एक वैश्विक संकल्पना आहे, याची उपस्थितांना जाणीव करून देण्यात आली.