२० नोव्हेंबर वार्ता: कोट्यवधी हिंदूंचे आराध्य दैवत प्रभु श्रीराम आणि अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह अन् धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्याप्रकरणी अक्कलकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याविषयी ज्ञानेश महाराव यांनी सोलापूर न्यायालयात केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने नाकारून दोन महिने झाले आहेत; मात्र अद्यापही पोलिसांनी त्यांच्याविरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नाही, हे अत्यंत संतापजनक आहे. पोलिसांच्या अशा निष्क्रीय भूमिकेमुळे श्रीरामभक्त, स्वामी समर्थभक्त आणि समस्त हिंदू समाज यांच्यात तीव्र असंतोष पसरला आहे. पोलीस प्रशासनाने ज्ञानेश महाराव यांना तात्काळ अटक करावी अन्यथा न्यायालयाचा अवमान केल्यााबद्दल आम्ही अवमान याचिका दाखल करू, असा इशारा ‘प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोट’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांनी दिला. या संदर्भातील निवेदन सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना या वेळी देण्यात आले. या वेळी प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोटचे श्री. प्रसाद पंडित, हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे, श्री. दत्तात्रय पिसे आणि सनातन संस्थेचे श्री. हिरालाल तिवारी हे उपस्थित होते.
भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम २९९ व ३०२ अन्वये अक्कलकोट पोलीस ठाणे येथे ज्ञानेश महाराव याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच मा. न्यायालय सोलापूर यांनी या दखलपात्र गुन्ह्यात जामीन नाकारला आहे. गुन्हा घडून तब्बल दोन महिने होऊनही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाची कार्यक्षमता आणि निष्पक्षता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकूणच कारवाईत दिरंगाई केल्याबद्दल संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
नवी मुंबई येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात ज्ञानेश महाराव यांनी सार्वजनिक मंचावर हिंदूंच्या श्रद्धास्थानांविषयी अत्यंत बदनामीकारक आणि अपमानास्पद विधाने केली होती. यामुळे अक्कलकोट पोलीस ठाणे येथे त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. याच प्रकरणावरून महाराष्ट्रात एकूण पाच ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे नोंद झालेले आहेत. असे असतांनाही पोलिसांनी अद्याप त्यांना अटक केलेली नाही. हिंदू सहिष्णु आहेत. कायदेशीर प्रक्रियेवर विश्वास ठेवतात; म्हणून त्यांच्या भावनेला ठेच पोहचवणार्यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर करूनही अटक केली जात नाही, हे अनाकलनीय आणि संतापजनक आहे. जर हीच घटना अन्य धर्माच्या संदर्भात घडली असती, तर पोलिसांनी लगेच आरोपीला अटक करून तुरुंगात टाकले असते, असे हिंदु जनजागृती समितीने म्हटले आहे.